उद्या होणार महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार? अनेकाची वर्णी लागण्याची शक्यता

महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार

र्थ, गृह, महसूल अशा महत्त्वाच्या खात्यांवरून राजी, नाराजीत राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे महायुतीचे भिजत घोंगडे सतत कायम असल्याने आता हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूर मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता बळावली आहे. विधानभवन अथवा राजभवनाच्या हिरवळीवर हा सोहळा होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून समजते.

मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने नागपूरला आल्यानंतर हा शपथविधी सोहळा देखील नागपुरात झाल्यास नागपूर किंबहुना विदर्भाचे राजकीय महत्त्व पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात वाढणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यानंतर लवकरच शपथविधी होईल. तुम्हाला सर्व काही सांगितले जाईल, असे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बहुदा १४ डिसेंबरलाच शपथविधी होईल, असे संकेत दिले.

या पार्श्वभूमीवर आता १४ डिसेंबरचा मुहूर्त चुकल्यास, तिन्ही पक्षात मंत्रिपदावरून एकमत न झाल्यास हा शपथविधी नागपुरातच होईल हे स्पष्ट आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच रविवारी देवेंद्र फडणवीस नागपुरात येत आहेत. विमानतळावर १२ वाजता त्यांचे आगमन व जंगी स्वागतासह रॅलीची तयारी झाली आहे. अर्थातच आता या शपथविधीत विदर्भातील कुणाची वर्णी लागणार याविषयीची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे.

भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, १४ तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईलच, असे सांगता येत नाही. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारावरून महायुतीमध्ये दोन पक्षांमध्ये वेगवेगळी मते असल्याचे पाहायला मिळाले होते. आता १५ तारखेला विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Rashtra Sanchar: