मुंबई : Mahesh Tapase Reaction On High Court relief by Anil Deshmukh – राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेल्या देशमुख यांना 11 महिने गजाआड राहिल्यानंतर आज दिलासा मिळाला असून मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. देशमुखांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
राष्ट्रावादी काँग्रेस प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी याबाबत बोलताना “हा सत्याचा विजय” असल्याचं म्हटलं आहे. “आज अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. आम्ही सुरुवातीपासून हेच म्हणत होतो की, अनिल देशमुखांवरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. हे आरोप राजकीय आरोप होते. अखेर आज न्यायदेवतेनं न्याय करत अनिल देशमुख यांना जामीन दिला आहे. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे”, अशी प्रतिक्रिया महेश तपासे यांनी दिली आहे.
“गेल्या 11 महिन्यांपासून अनिल देशमुख यांना त्रास दिला जात होता. यात पूर्णपणे भाजपचा हात होता. ज्यांनी आरोप केले ते कोणताच पुरावा सादर करू शकले नाहीत. मात्र, आज अनिल देशमुखांना जामीन मंजूर झाला आहे. तसंच या प्रकरणातून त्यांची लवकरच निर्दोष मुक्तता होईल”, असंही तपासे म्हणाले.