कोलकत्ता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिंदे सरकार बेकायदेशीर असल्याचं म्हणत ममता बॅनर्जी यांनी गंभीर आरोप केले आहेत. उद्धव सरकार पाडण्यासाठी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पैशाशिवाय आणखीही काही देण्यात आले आहे, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत विचारले असता ममता बॅनर्जी म्हणाल्या, महाराष्ट्रातील शिंदे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांनी सरकार जिंकले, पण महाराष्ट्राचे मन जिंकले नाही. तसंच महाराष्ट्राचा उल्लेख करत ममता म्हणाल्या, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी आसाममधील हॉटेलमध्ये लक्झरी लाइफ एन्जॉय केली. त्यासाठी पैसा कुठून आला? बंडखोर आमदारांना केवळ पैसाच पुरवला गेला नाही तर इतर अनेक गोष्टी पुरवल्या गेल्या. या सर्व गोष्टी कुठून आल्या? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. त्या इंडीया टुडे कॉन्क्लेव्ह ईस्टमध्ये बोलत होत्या.
पुढे आणखी काही सांगू शकाल? असं विचारलं असता ममता म्हणाल्या, अनेक वेळा गप्प बसणेच ‘गोल्डन’ आणि बोलणे ‘सिल्व्हर’ अथवा ‘चांदी’ होते. यामुळे मी गप्प राहणंच योग्य आहे.