राष्ट्रपती निवडणुकीसाठी तिसरी आघाडी! ममता बॅनर्जींचं पवार, ठाकरेंसह देशातील दिग्गज नेत्यांना पत्र

नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून देशात तिसरी आघाडी तयार करण्यासाठी अनेक विरोधी पक्ष एकत्र करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष मुख्य असल्याचं दिसत आहे. लवकरच राष्ट्रपती पदासाठी निवडणुका पार पडणार असल्यानं तिसऱ्या आघाडीचा प्रयोग केला जात असल्याचं चित्र दिसत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आगामी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसहित देशातील २२ नेत्यांना पत्र पाठवलं असल्याची माहिती आहे.

राष्ट्रपती पदाची निवडणूक १८ जुलै रोजी पार पडणार आहे तर त्याचा निकाल 21 जुलै रोजी लागणार आहे. या निवडणुकीत मतांची जुळवाजुळव करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक तयारीला लागले आहेत. यावेळी विरोधी पक्षांची ताकत वाढवण्यासाठी ममता बॅनर्जींनी पुढाकार घेतला आहे. माहितीनुसार ममता बॅनर्जींनी विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी १५ जून रोजी दिल्लीत संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासंधार्भात विरोधी पक्षातील नेत्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे.

त्या नेत्यांच्या यादीत महाराष्ट्रातील शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसह दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन त्याचबरोबर ओडीसा, तेलंगाना, तमिळनाडू, झारखंड, पंजाब या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात आल्याची माहिती आहे. या सर्व नेत्यांसह २२ दिग्गज नेत्यांना पत्र पाठवण्यात आलं आहे.

Sumitra nalawade: