आईच्या ऑपरेशनसाठी लेकाने घातला शेजारच्याला गंडा

Blue Guest Featured Live Event Twitter Post 82Blue Guest Featured Live Event Twitter Post 82

पुणे | आर्थिक चणचण आणि आईच्या शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या पैशांसाठी चक्क शेजाऱ्याचे बंद घर फोडून दागिने आणि रोकड चोरल्याचा प्रकार बिबवेवाडी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी चोरट्याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून सव्वा सात लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले.

दीपक नामदेव पाटोळे (वय ४१) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ‌ठाण्यात गुन्हा करण्यात आला होता. दीपक बेरोजगार आहे. तो आणि त्याची वृद्ध आई बिबवेवाडीतील एका सोसायटीत राहायला आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्याची आर्थिक चणचण सुरू होती. आई आजारी असल्याने डाॅक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास सांगितले होते. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दीपकने शेजाऱ्यांच्या बंद सदनिकेचे कुलूप तोडून दागिने आणि रोकड चोरली होती. शेजारी मूळगावी सोलापूरला गेले होते. गावाहून परत आल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला होता.

बिबवेवाडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. गेले सहा महिने गुन्ह्याचा छडा लागला नव्हता. अखेर तपासात मिळालेल्या माहितीनुसार, शेजारी दीपक पाटोळेने शेजाऱ्यांच्या घरात चोरी केल्याचे उघडकीस आले. पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने घरफोडीची कबुली दिली.

बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, संतोष जाधव, विशाल जाधव, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, प्रणय पाटील, ज्योतिष काळे, अभिषेक धुमाळ यांनी ही कामगिरी केली.

Rashtra Sanchar Digital:
whatsapp
line