मुंबई : अभिनेत्री मंदाकिनी २६ वर्षांनंतर बॅालिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘राम तेरी गंगा मैली’ या सिनेमाच्या माध्यमातून मंदाकिनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. नंतर ती बरेच दिवस सिनेसृष्टीपासून दूर होती. आता ती तिचा मुलगा रब्बिल ठाकूरसोबत एका गाण्यात दिसणार आहे.
मंदाकिनी ‘मा ओ मां’ या आगामी गाण्यातून पदार्पण करणार आहे. या गाण्याचं दिग्दर्शन साजन अग्रवाल यांनी केलं आहे. तसंच या गाण्याच्या माध्यमातून मंदाकिनीचा मुलगा सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. साजन अग्रवाल म्हणाले,”मंदाकिनीसोबत काम करण्याचे माझेही स्वप्न पूर्ण होत आहे”.
साजन अग्रवाल यांनीच ‘मा ओ मां’ या गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर गुरुजी कैलास रायगर यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे. तसेच ऋषभ गिरी यांनी हे गाणं गायले आहे. साजन अग्रवाल लवकरच एक लघुपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात मंदाकिनी मुख्य भूमिकेत असणार आहे.