मुंबई : (Manisha Kayande Join Shinde Group) मागील वर्षभरापासून ठाकरेंच्या शिवसेनेला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. उद्या सोमवार (दि. 19 जून) रोजी शिवसेनेचा वर्धापण दिन आहे. मात्र, त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. कारण पक्षाच्या प्रवक्त्या आणि विधानपरिषदेच्या आमदार यांनी शिवसेना जय महाराष्ट्र केला आहे. त्यांच्यासोबत इतर तीन माजी नगरसेवक देखील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, रविवार सायंकाळी पाच वाजता मनिषा कायंदे वर्षा या निवासस्थानी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी मनिषा कायंदे यांना गळाला लावून मातोश्रीला चांगलाच झटका दिल्याची चर्चा आहे. आक्रमकपणे शिवसेनेची बाजू मांडणाऱ्या नेत्या म्हणून मनिष कायंदे यांची ओळख होती. त्यांना मुंबई महानगरपालिकेतील राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे. साहजिकच आगामी पालिका निवडणुकीत ठाकरे गटाला यामुळे नुकसान होऊ शकते.
अद्याप मनिषा कायंदे किंवा शिंदे गटाकडून यासंदर्भात कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही. मात्र, मनिष कायंदे यांच्या शिंदे गटात जाण्याने आम्हाला फारसा फरक पडणार नाही. इतके आमदार आणि खासदार शिवसेना सोडून गेले, तेव्हाही आमचा पक्ष तसूभर ढळला नाही. अशाप्रकारचा कचरा इकडून तिकडे जात असतो, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि संजय राऊत यांनी व्यक्त केली.
शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेते शिशिर शिंदे यांनीही ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. ठाकरे गटाचं उपनेतेपद शिशिर शिंदे यांच्याकडे होतं. या उपनेतेपदाचा राजीनामा शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे काल सुपूर्द केला आहे. शिशिर शिंदे यांनी उद्धव यांना एक पत्रही पाठवले आहे. आपल्याला ठाकरे गटात मनासारखं काम करायला मिळत नाही. पक्षात होणारी घुसमट आपणच थांबवत असल्याचे शिशिर शिंदे यांनी पत्रात नमूद केल्याची माहिती आहे.