मुंबई | Manisha Kayande On Amit Shah – सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात हा दौरा असल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला संबोधित करताना अमित शाह यांनी आक्रमक भूमिका घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. “उद्धव ठाकरे यांनी धोका दिला आणि धोका देणाऱ्यांना जमीन दाखवा”, असं आवाहन शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांना केलं. यावर आता शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
यावेळी मनिषा कायंदे म्हणाल्या, “2014 मध्ये युती कोणी तोडली? तेव्हा भाजपनेच युती तोडली होती. हे आज नैसर्गिक युतीच्या गोष्टी करतात. भाजप आणि पीडीपी युती करतात. ती कोणती नैसर्गिक युती आहे? जे नितीश कुमार म्हणतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) बॅन करा, त्यांच्याशी युती करतात. मायावतींशी युती करतात आणि राज्य चालवतात. धडा कोण कुणाला शिकवेल हे बघू.”
“अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत. खरंतर गृहमंत्र्यांनी धडा शिकवणार अशी भाषा बोलू नये,” असंही कायंदे यांनी म्हटलं आहे. तसंच “भाजपचे आतापर्यंत अनेक टार्गेट ठरले, पण हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्यांना वारंवार अनेकांपुढे का जावं लागतंय? ते स्वबळावर का लढत नाही? त्यांना मनसे तरी का पाहिजे? तुम्ही बलाढ्य, महाशक्ती आहात म्हणता मग महाशक्तीला स्वतःच्या बळावर लढता येऊ नये का?” असा सवाल देखील मनिषा कायंदे यांनी विचारला आहे.