सांगली : (Manoj Jarange On Chhagan Bhujbal) मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आज सांगलीमध्ये सभा झाली. यावेळी मराठा समूदायाला संबोधित करताना ते म्हणाले की, ‘आता आराम करुन चालणार नाही. नाहीतर आपल्या लेकरांचं वाटोळं होईल. आपल्या लेकरांना भविष्यात त्रास होईल असं आपल्याला काही करायचं नाही.’ जरांगेंच्या सभेवेळे प्रचंड घोषणाबाजी झाल्याचं पाहायला मिळालं.
मराठा समाज कधी शहाणा होणार. सर्वांची पोरं ऊस तोडायला गेल्यावर शहाणा होणार का? आता गाफील राहून चालणार नाही. सगळ्यांनी चारी बाजूंनी मराठ्याला घेरलं आहे. हे षडयंत्र मोडून काढण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागले. गेल्या ७० वर्षांपासून असलेला वेढा आपल्याला फोडावा लागेल. ज्या मराठा बांधवांना आरक्षण आहे, त्यांनीही एकत्र घेण्याची येण्याची गरज आहे, असं जरांगे म्हणाले.
बिगर कामाचे कळपं एकत्र यायला लागले आहेत. पण, एकटा मराठा समाज राज्यात ५० टक्क्यांच्या वरती आहे. त्यामुळे कितीही कळपं एकत्र आले तरी टेंशन घेण्याची गरज नाही. आज जात वाचवणं आवश्यक आहे. त्यामुळे आरक्षण असलेल्या आणि नसलेल्या बांधवांनी एकत्र यावं. आपल्याला आव्हाव पेलायचं आहे. आपल्या मुलांना मोठं करण्यासाठी सज्ज रहा, असंही ते म्हणाले.