‘या’ क्षेत्रात करायचं होतं करियर.. पण ओघाओघाने अभिनेता झालो; ओंकार भोजने

मुंबई : (Marathi Actor Omkar Bhojane) महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेला अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. तो सध्या सर्वाधिक चर्चेत असणारा अभिनेता आहे. हास्यजत्रामधील त्याची यशस्वी वाटचाल, त्यानंतर तिथून बाहेर पडत त्याने निवडलेली नवी वाट.. यामुळे त्याचे कौतुकही झाले, अन् टीकाही. पण तो मागे हटला नाही.. ‘हौस आकाशी उंच उडायची’ म्हणत त्याने झेप घेतली आणि ‘सरला एक कोटी’सारखा दमदार चित्रपटात काम केलं आणि आपल्या अभिनयाचा एक वेगळा ठसा प्रेक्षकांच्या मानात उमटवला.

एवढेच नाही तर आता तो ‘करून गेलो गाव’ या धुमशान घालणाऱ्या मालवणी व्यावसायिक नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या नाटकाची सध्या जोरदार चर्चा असून ‘हाऊसफुल्ल’च्या पाट्या झळकत आहेत. याच निमित्ताने हरहुन्नरी ओंकारशी सकाळ unplugged मध्ये दिलखुलास संवाद साधला. यावेळी त्याने आपल्या करियर बाबत मोठा खुलासा केला. ओंकार जरी आज मनोरंजन क्षेत्रात पूर्णवेळ कार्यरत असला तरी आपण अभिनेता व्हावं असं कधीच त्याच्या मनात नव्हतं. लहानपणी कुटुंबासोबत नाटक पाहणं, घरी कॅसेट आणून नाटक पाहणं याची आवड होती पण प्रत्यक्षात मात्र आपण अभिनय करू असे त्याला कधीच वाटले नाही.

शाळेत असतानाही तो खेळात जास्त सक्रिय होता. पण अभिनयाशी त्याचा खरा संबंध आला ते महाविद्यालयीन जीवनात. कॉलेजला असतानाही त्याचा खेळाकडे अधिक कल होता. पण एकांकिका स्पर्धा करून अभिनयाची आवड लागली.. या मुलाखतीत ओंकार म्हणाला, ‘मी कॉलेजला असतानाही हॉलीबॉल खेळण्यात मला जास्त रस होता. पण एकांकिका स्पर्धेत भाग घेऊन नाटकाची आवड वाढली. चार दोन पारितोषिकं मिळवल्यावर ते आपसूकच जाणवू लागलं. पण मला अभिनेता व्हायचं नव्हतं.’

पुढे तो म्हणाला, ‘मला लहानपणा पासून एक इच्छा मनात होती.. ती म्हणजे मला सैन्यात किंवा पोलिसात भरती होण्याची, ती मात्र अपूर्ण राहिली. आपणही एन्काऊंटर स्पेशल अधिकारी व्हावं असं खूप वाटायचं. जर अभिनेता झालो नसतो तर पोलिस नक्कीच झालो असतो,’ असं तो सकाळ डिजिटलच्या मुलाखतीत म्हणाला. सोबत त्याचं प्रेम, कॉलेज लाईफ, क्रश, हास्यजत्रा अशा अनेक गोष्टींचा खुलासा त्याने या मुलाखतीत केला.

Prakash Harale: