पुणे : (Marathi Cineme Gadad Andhar) ‘गडद अंधार’ हा आगामी मराठी चित्रपट मराठी सायन्स फिक्शनचा भन्नाट नमुना असणार आहे. आजवर मराठी चित्रपटांच्या पटलावर कधीही न दिसलेलं पाण्याखालचं जग ‘गडद अंधार’मध्ये पाहायला मिळणार आहे. बऱ्याच रहस्यांचा उलगडा करत एक थरारक अनुभव देणारा ‘गडद अंधार’ हा सुपर नॅचरल थ्रीलरपट ३ फेब्रुवारी २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
निर्माते कॅप्टन अवधेश सिंग आणि वर्षा सिंग यांनी इलुला फिचर व्हिजन प्रा. लि. च्या बॅनरखाली ‘गडद अंधार’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मराठीत एक अनोखं धाडस करत दिग्दर्शक प्रज्ञेश रमेश कदम यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. फर्स्ट लुक, टिझर आणि नुकत्याच रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये ‘गडद अंधार’ची अचूक झलक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. मन मोहून टाकणारी पाण्याखालची सिनेमॅटोग्राफी हे या चित्रपटाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. वरवर निळ्याशार दिसणाऱ्या समुद्राच्या खोल पाण्यात गडद अंधार आहे. या गडद अंधारात बरीच रहस्ये दडलेली आहेत. पाण्याखालच्या अंधारात दडलेलं एक रहस्य जेव्हा जमिनीवरील प्रकाशात येतं तेव्हा काय घडतं ते या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
ताल धरायला लावणारं गायक-संगीतकार रोहित श्याम राऊतचं संगीत या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू आहे. यातील ‘दरिया, दरिया…’ हे गाणं चांगलंच गाजत आहे. ‘गडद अंधार’चं कथानक आजवर कधीही प्रकाशात न आलेल्या पैलूंवर प्रकाशझोत टाकणार असल्याचे संकेत ट्रेलर पाहिल्यावर मिळतात. दिग्दर्शक प्रज्ञेश कदम यांनी या चित्रपटाच्या निमित्तानं प्रवाहापेक्षा काहीसं वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचंही जाणवतं. या चित्रपटाचं लेखन प्रज्ञेश कदम यांनी लौकिक आणि चेतन मुळे यांच्या साथीनं केलं आहे. चित्रपटातील संवादही अतिशय मार्मिक असून विचार करायला लावणारे आहेत.