पुणे ः गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कोणतेही तमाशा फड व राहुट्या उभारल्या नाहीत. यंदा मात्र कोरोनाची तिसरी लाट जसजशी ओसरू लागली तसतशी बाजारपेठा खुल्या झाल्या. कोरोनासंदर्भातील जे काही नियम केले होते, ते शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा गावाकडच्या यात्रेला रंग भरू लागला आहे. चैत्र पाडव्यापासून तमाशा फडाच्या सुपार्या दिल्या जातात, त्यामुळे आता ‘ढोलकीच्या तालावर’ थाप पडल्याचे कानी पडणार आहे.
सध्या लोकसंगीताचे कार्यक्रम सुरू आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून हे कार्यक्रम बंद होते. कोरोनाची लाट ओसरल्याने सध्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. १०० टक्के नाही, पण २५ टक्के तरी सीझन कलावंतांना मिळत आहे. पण हे जरी होत असले तरी लॉकडाऊनमधील सर्वात वाईट काळ कलावंतांवर आला होता. त्यामुळे जे दोन वर्षांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, ते मात्र अद्यापही भरून निघालेला नाही. या कलावंतांना शासनाकडून कोणतीही मदत झाली नाही. तरी गावोगावी तमाशाचे फड रंगवावेत.
_सुरेखा पुणेकर, लावणीसम्राज्ञी
कोरोनाकाळात अक्षरशः तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. तमाशा मंडळावर कर्ज काढून आपल्या ताफ्यातील कलावंतांना जेवण घालण्याची वेळ आली होती. शिमग्यापासून महाराष्ट्रातल्या गावोगावच्या यात्रांना सुरुवात होते. मात्र कोरोनामुळे प्रसिद्ध देवस्थान, तसेच गावोगावच्या गर्दीच्या यात्रा रद्द झाल्याने मोठ्या तमाशा मंडळासह लहान तमाशा मंडळाच्या लाखो रुपयांच्या यात्रांच्या सुपार्या रद्द झाल्या होत्या. यामुळे तमाशा कलावंत हतबल झाले होते. ग्रामीण भागातील भूमिहीन शेतमजूर तसंच कला अंगी असणार्या लोकांनी तमाशाच्या माध्यमातून लोककला जपली असून हा वर्ग तमाशाच्या माध्यमातून रोजगार मिळवतो. मार्च ते मे असे तीन महिने तमाशा मंडळात काम करून स्वतःची आर्थिक परिस्थिती सावरणारे अनेक लोक तमाशामधून काम करून आपली उपजीविका भागवली जाते. यात्रेत तमाशाच्या माध्यमातून सर्वांचे मनोरंजन होत असते. कलाकारांची कला पाहण्यासाठी गावकरी मंडळी फेटे उडवत, शिट्या, टाळ्या वाजवत असतात.
यंदा मात्र गावातील प्रमुख देवस्थानांच्या यात्रा होत असल्याने तमाशा कलावंतांवरील उपासमारीची वेळ टळली आहे. गेल्या काही वर्षांपासून आर्थिकटंचाईचा सामना करणार्या तमाशा कलावंतांना नोटाबंदी, कोरोनाच्या संकटाने आर्थिक फटका दिला आहे. होळीपासून महाराष्ट्रातल्या प्रमुख देवस्थानाच्या गावोगावच्या यात्रा-जत्रांना सुरुवात होते. यात्रांचा खरा हंगाम पाडव्यापासून सुरू होतो. यंदा तमाशा कार्यक्रमाच्या सुपार्या दिल्याने कलावंतांमधून समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तमाशा ठरविण्यासाठी गावोगावच्या अनेक ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. गेली दोन वर्षे तमाशासह सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम कोरोना संसर्गामुळे झाले नाहीत.
यामुळे तमाशापंढरीत मोठी गर्दी जमल्याने पाहावयास मिळत आहे. एकंदरीत सर्वच तमाशारसिकांचा उत्साह पाहता यावर्षी तमाशा कलावंत व फडमालकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. यावर्षी बैलगाडा शर्यतींबरोबर तमाशालादेखील गावोगावच्या यात्रेमध्ये मोठी मागणी आहे. मागील दोन वर्षांपासून तमाशाचे कार्यक्रम पाहता न आल्यामुळे सध्या सर्वत्र सुरू असलेल्या विविध यात्रांमध्ये कार्यक्रमांना तमाशा रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.