बेळगाव : (Marathi Mayor in Belgaum Municipal Corporation) बेळगाव महापालिका निवडणूक झाल्यानंतर तब्बल 17 महिन्यांनी बेळगावकरांना महापौर-उपमहापौर मिळाला आहे. बेळगाव महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या महापौर व उपमहापौर पदी मराठी भाषिक महिलांची निवड झाली आहे. महापौरपद खुल्या वर्गातील नगरसेविकेसाठी राखीव होते. महापौर-उपमहापौर निवडणुकीसाठी अनगोळ येथील मराठा नगरसेविका शोभा सोमनाचे तर शाहूनगरच्या नगरसेविका रेश्मा पाटील यांनी सकाळीच नामांकन दाखल केले.
महापौर पदासाठी काँग्रेसने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. महापौर निवडणुकीसाठी भाजपच्या अनगोळच्या प्रभाग 57 च्या नगरसेविका शोभा मायाप्पा सोमनाचे यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचाही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, त्यामुळे शोभा सोमनाचे यांची बेळगाव महापौर पदी निवड झाली. उपमहापौर पदासाठी प्रभाग 33 च्या रेश्मा प्रवीण पाटील आणि 9 च्या नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे अशा दोघाजणांनी अर्ज केले होते.
वैशाली भातकांडे यांना 4 मते तर रेश्मा पाटील यांना 42 मते पडली. त्यामुळे रेश्मा पाटील या 38 मतांच्या मोठ्या फरकाने उपमहापौर पदी निवडून आल्या आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तीनही नगरसेवकांनी मतदान केले; मात्र नगरसेविका भातकांडे यांना चौथेही मत पडले. आगामी विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून मराठी मतदारांना खूश करण्यासाठी भाजपने मराठा समाजाला महापौर-उपमहापौरपद दिले आहे. कन्नड संघटनांच्या दबावाला झुगारून भाजप नेत्यांनी दोन्ही मराठा समाजातील उमेदवारांना प्राधान्य देत मनपावर पुन्हा मराठीचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
यामुळे कन्नडिगांचा हिरमोड झाला आहे. महापालिका सभागृहात भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. 58 पैकी 35 नगरसेवक भाजपचे असून पदसिद्ध 7 सदस्यांपैकी 5 सदस्य त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे भाजपचे संख्याबळ 40 आहे.