सध्या लोक चित्रपटांपेक्षा वेब सीरिज (Web Series) पाहण्यावर मोठ्या प्रमाणात भर देताना दिसतात. मग इंग्रजी असो, हिंदी असो किंवा मराठी वेब सीरिज असो ओटीटीवर (OTT) या वेब सीरिज धुमाकूळ घालताना दिसत आहेत. हिंदी, इंग्रजी सीरिजप्रमाणेच मराठी सीरिजही चांगल्याच गाजल्या आहेत. काही मराठी वेब सीरिजने तर प्रेक्षकांना वेड लावलं आहे. त्यामुळे प्रेक्षक नवनवीन मराठी वेब सीरिज पाहण्यासाठी नेहमी आतुर असतात. तसंच इंटरनेटवर अनेक मराठी वेब सीरिज उपलब्ध आहेत. पण यामधील काही अशा सीरिज आहेत ज्या खरंच पाहण्याजोग्या आहेत. या सीरिज प्रत्येकाने एकदातरी पाहिल्याच पाहिजेत. चला तर मग या वेबसीरिज कोणत्या आहेत याबाबत जाणून घेऊया.
1. वन्स अ इयर – ‘वन्स अ इयर’ (Once A Year) ही मराठी वेब सीरिज चांगलीच गाजली होती. या सीरिजचे कथानक एकदम यूनिक आणि हटके आहे. ही सीरिज एकूण सहा एपिसोड्सची आहे. विशेष सांगायचं झालं तर, सहा वर्षांमधल्या प्रत्येक वर्षी एक यानुसार सहा दिवसांमध्ये घडलेल्या घटना या सीरिजमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. निपुण धर्माधिकारी आणि मृण्मयी गोडबोले या कलाकारांनी या सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तसंच या सीरिजला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असून ही सीरिज प्रत्येकाने एकदा तरी पाहिलीच पाहीजे.
2. समांतर – समांतर (Samantar) ही मराठी वेब सीरिज प्रदर्शित झाल्यानंतर चांगलीच चर्चेत होती. या वेब सीरिजला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. या सीरिजमध्ये स्वप्नील जोशी, निखिल भारद्वाज, तेजस्विनी पंडीत, सई ताम्हणकर, गणेश रेवडेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तसंच या सीरिजमध्ये एका सर्वसाधारण माणसाची चित्तथरारक कथा तुम्हाला पाहायला मिळेल. या सीरिजचे दोन्ही सिझन प्रदर्शित झालेले आहेत. ही सीरिजदेखील पाहण्याजोगी असून ज्यांनी पाहिली नाहीये त्यांनी एकदा तरी पाहिलीच पाहीजे.
3. हिंग पुस्तक तलवार – हिंग पुस्तक तलवार (Hinga Pustak Talwar) या वेब सीरिजचे कथानक अत्यंत हटके आहे. या सीरिजमध्ये सात मित्रांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येकजण वेगवेगळ्या कॅरेक्टमध्ये दाखवण्यात आलं आहे. सध्याच्या तरूणाईला रिलेट होईल असा, त्यांना पाहण्याजोगी अशी ही सीरिज आहे. आजच्या पिढीतील तरूणाईचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कशा प्रकारे बदलत चालला आहे हे या सीरिजमधून दाखवण्यात आलं आहे.
4. काळे धंदे – ज्यांना कॉमेडी सीरिज पाहायला आवडत असेल अशांनी ‘काळे धंदे’ (Kaale Dhande) ही वेब सीरिज पाहावी. ही सीरिज अडल्ट कॉमेडी स्वरूपाची आहे. या सीरिजमध्ये विक्कीला त्याचा काका नको त्या अवस्थेत पाहतो आणि त्यानंतर विक्की चांगलाच गोत्यात येतो. तसंच या सीरिजमध्ये बोल्ड सिन्स आणि अडल्ट भाषेचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे ही सीरिज लहान मुलांनी पाहू नये.