नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित महिला इंडियन प्रीमियर लीग (डब्ल्यूआयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या पहिल्या हंगामाचे पुढील वर्षी मार्चमध्ये आयोजन केले जाणार आहे. पुरुषांच्या ‘आयपीएल’पूर्वी महिलांची ही स्पर्धा खेळण्यात येईल. महिलांच्या ‘आयपीएल’मध्ये पाच संघांचा सहभाग असेल. या स्पर्धेत एकूण २० सामने होतील. संघ दोन वेळा एकमेकांविरुद्ध सामने खेळतील. साखळी फेरीअंती गुणतालिकेत अग्रस्थानी असलेला संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानासाठी ‘एलिमिनेटर’चा सामना खेळविण्यात येईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पत्रकानुसार, प्रत्येक संघाला आपल्या अंतिम एकादशमध्ये पाच विदेशी खेळाडूंचा समावेश करण्याची मुभा असेल.
‘‘स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंमध्ये समतोल साधण्यासाठी, तसेच तुल्यबळ संघ निर्माण करण्यासाठी ‘डब्ल्यूआयपीएल’मध्ये सध्या पाच संघांचा समावेश करण्याचा निर्णय झाला आहे. प्रत्येक संघात १८ खेळाडू असतील, ज्यात सहा विदेशी खेळाडूंचा समावेश असेल. तसेच प्रत्येक संघाच्या अंतिम एकादशमध्ये पाचहून अधिक विदेशी खेळाडू असू शकणार नाहीत. यामधील चार खेळाडू ‘आयसीसी’चे पूर्ण सदस्यत्व असलेल्या देशांतून, तर अन्य एक खेळाडू ‘आयसीसी’च्या साहाय्यक सदस्य देशांतील असेल,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
महिलांच्या ‘आयपीएल’मध्ये संघांची संख्या कमी असल्याने घरच्या आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानांवर सामन्यांचे आयोजन करणे शक्य होणार नाही, असे ‘बीसीसीआय’ला वाटते. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या महिला ट्वेन्टी-दक्षिण आफ्रिकेत फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर लगेचच महिला ‘आयपीएल’च्या पहिल्या हंगामाचे आयोजन केले जाऊ शकेल.