डोकं ‘बंद’ ठेवून कसं चालेल?

मार्गशीर्ष वद्य एकादशी दिवशी ‘पंढरपूर बंद’ ची घोषणा ही अत्यंत अप्रस्तुत आणि अयोग्य होती. ज्या कारणामुळे बंद ठेवला आहे ते कारण समर्थनीय असले, तरीही स्थळ, काळ, वेळ, नागरिकांच्या सुविधा आणि त्यातून उद्देश सफल होण्यासाठीची नेमकी कृती याचे तारतम्य न बाळगत हा बंद पुकारण्यात आला होता. भाजपाच्या वाचाळवीरांच्या विरोधामध्ये पंढरपुरातच नव्हे तर महाराष्ट्रात आक्रोश आहे. अनेक ठिकाणी बंद पाळून निषेध व्यक्त करून राज्यपाल कोश्यारी, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, त्रिवेदी यांचा निषेध व्यक्त केला गेला. दुर्दैवाने हा वाद बहुजन विरुद्ध बहुजनेतर समाज अशा पातळीवर जात आहे, ते अत्यंत दुर्दैवी आहे. हा संपूर्ण प्रकार भाजपाच्या काही मोजक्या लोकांविरोधात, फार फार तर त्या पक्षाविरोधात होऊ शकतो, परंतु याला कुठलाही जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला तर हा लढा ‘संकुचित’ होऊन जाईल, याचे भान देखील आंदोलकांनी ठेवले पाहिजे.

पढरपुरात देखील आज जो बंद पुकारण्यात आला, त्याबद्दल देखील सर्वांनी स्वागत करून त्या कृतीमध्ये सर्वांनी सहभाग घेतला. बंद करून, आंदोलन करून, मोर्चा काढून या प्रकाराचा निषेध व्यक्त झालाच पाहिजे आणि राज्यभरामध्ये हा आक्रोश व्यक्त झाल्यानंतर महापुरुषांची अवहेलना ही जनता सहन करणार नाही असा संदेश देखील गेला पाहिजे, तसेच भाजपाच्या देखील लोकांना त्यांच्याविरुद्ध आक्रोश आहे याचा संदेश देखील योग्य प्रकारे पोहोचला पाहिजे. झी नाहीत, ते लागलीच परततात, हे एक पर्यटकीय संकटच ओढवत आहे. त्यात एकादशी, पौर्णिमा, मार्गशीर्ष महिना, अधिक महिना यानिमित्ताने लहान-मोठे बारा बलुतेदार असलेले समाज बांधव व्याजानं पैसे घेऊन मंदिर परिसरामध्ये अधिकचा माल भरतात आणि येणाऱ्या भाविकांवर भरवसा ठेवून चार पैसे अधिक मिळतील याचा प्रयत्न करतात. पंढरपुरची भूमी आता केवळ पंढरपुरकरांची राहिलेली नाही तर ती वारकरी संप्रदायाची भूमी म्हणून अवघ्या महाराष्ट्राच्या भाविकांची, तीर्थक्षेत्र पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची झालेली आहे. त्या पर्यटकांची गैरसोय होता कामा नये ही देखील जबाबदारी आपलीच आहे. त्याचे भान आपल्याला विसरून चालणार नाही.

मार्गशीर्षमध्ये एकादशीसारखा दिवस पंढरपुरामध्ये अधिकाधिक भाविक आणि पर्यटक येण्याचा दिवस असतो. अशा वेळेस दुकाने बंद करून त्यांचे स्वागत करणे हे योग्य नव्हते. व्यक्त केला गेलेला निषेध हा व्यक्त झाला पाहिजे परंतु त्यासाठी हा दिवस मात्र चुकीचा होता. त्यामध्ये मंदिर परिसरातील लोकांनी बंद ठेवला नाही म्हणून काही वाचाळवीरांनी चक्क कॉरिडॉरला पाठिंबा दाखवला म्हणजे ‘वड्याचे तेल वांग्यावर’ काढण्याचा हा प्रकार आहे. कोश्यारी, पाटील, लाड यांच्या वाचाळपणावर कडी करत हा एक मूर्खपणाचा प्रकार झाला.

वास्तविक पाहता मंदिर परिसर बंद ठेवून लोकांनी त्यात सहभाग घेतला परंतु ऐकीव माहितीच्या आधारे आणि स्वस्त झालेल्या टेलिव्हिजनच्या कॅमेऱ्यासमोर आपल्या संतापी भूमिका अनावर करताना आपण कुठेतरी सामाजिक घडी विस्कटत तर नाही ना? याचे भान देखील या चार-आठ आण्याच्या पुढार्‍ यांनी ठेवले पाहिजे . डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांची महती आणि त्यांचा अपमान हा खरंतर राष्ट्रीय वेदनेचा मुद्दा आहे. सर्वांनीच पोटतिडकीने यामध्ये उतरून भाजपाला सळो की पळो करण्याची गरज आहे. त्या भाजपाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या येथील दोन आमदारांना मात्र साळसूतपणे सर्व आंदोलकांनी बाजूला ठेवले, ते देखील महाभाग यावर तोंड उघडायला तयार नाहीत. याचा खरंतर जाब विचारला पाहिजे. परंतु ते न करता कॅमेऱ्यासमोर आपली छबी दाखविण्याच्या नादात काहीतरी वाचाळवीरता करायची आणि या समतेच्या भूमीला कलंक लावण्याचा प्रयत्न करायचा हा अनाठाई प्रकार दिसून आला. त्यात सध्या कॉरिडॉरच्या प्रकरणामुळे मंदिर परिसर आणि मंदिर परिसरातील बाहेरचे लोक असा एक वाद निर्माण केला जात आहे. त्यात पुन्हा बहुजन आणि बहुजनेतर-ब्राह्मण असा एक सुप्त वाद जोपासला जात आहे.

ज्यांची घरे, दुकाने जात आहेत ते एकाच ठराविक समाजाचे आहेत म्हणून त्यांची पोटेतिडीक चालली आहे असा एक प्रचार केला जात आहे. प्रत्यक्षात या मूर्खांच्या हे लक्षात येत नाही की, मंदिर परिसरावर जगणाऱ्या कुटुंबांमध्ये आणि येथील व्यापार उदिम करणाऱ्यांमध्ये ब्राह्मण समाजापेक्षा बहुजन समाजाचे-बारा बलुतेदारांचे जास्त नुकसान होणार आहे. कुठल्याही गोष्टीला जातीय रंग देण्याची एक प्रथा दुर्दैवाने पंढरपुरमध्ये सुरू झाली आहे. त्याच्या पलीकडे जाऊन लोकांनी विचार केला पाहिजे आणि माध्यमांनी देखील आपल्या चौकटीमध्ये कुणाला किती ‘उंची’ द्यायची याचेही भान ठेवले पाहिजे. बंद होऊन निषेध जरूर व्यक्त झाला पाहिजे परंतु आपलं ‘डोकं’ बंद करून कसं चालेल.

Dnyaneshwar: