कलेत कशिदाकाम असते, मात्र मूळ कला झाकून जाईल, असे कशिदाकाम नसावे. असे काम अगदीच आवश्यक असेल तर करावे, अन्यथा मूळ कला, आशय इतका प्रभावी असतो, की तो जन्मलेल्या निरागस, निर्लेप बालकासारखा असतो. सजावट अगदी नाममात्र लागते त्याला. प्रभाताईंना कदाचित असेच काही म्हणायचे असेल. त्यांना त्यांचा सूर सापडला आहे. पुढच्या क्षितिजावरचाही नवा सूर सापडो, एवढीच परमेशचरणी प्रार्थना…!
किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांनी त्यांच्या पुणे येथे झालेल्या सत्कारात गायनात कलाकुसर किती असावी, याचा धडा दिला. नव्या गायकांसाठी उपदेश केला. खरंतर त्यांनी आपल्या भाषणाच्या समारोपात जी कविता, स्वतः लिहिली होती ती सादर करताना नव्या िक्षतिजावरच्या खुणावणाऱ्या सुराचा उल्लेख केला आणि त्यांच्या अभ्यासू, शालीन, नम्र आणि नादब्रह्माच्या शोधाच्या अनावर इच्छेचा परिचय नव्याने अधोरेखित केला. किराणा घराण्यातले हे मोठे नाव. वयाच्या नव्वदीत, आजही संगीतसाधनेत मग्न ठेवताना अमूर्ततेच्या मुळाशी जाण्याचा एक अवघड प्रयोग त्या करू इच्छितात.
कलाकाराच्या मनात जे असतं तो असतो निराकार, अमूर्त असा आशयाचा अंनत, अरुप असा अनुभव! हा अनुभव रेषा, अक्षर, मुद्रा किंवा आवाजातून प्रतिबिंबित करायचा, हे मोठे आव्हान असते. तो अनुभव व्यक्तिसापेक्ष, केवळ खासगी, अमर्याद असला तरी वैयक्तिक असतो. त्याला शब्द, रेषा, हावभाव किंवा आवाजात मूर्त स्वरूपात आणायचा आणि श्रोता, दर्शकाला पुन्हा अमूर्त किंवा निर्गुण अशा अनुभवाकडे न्यायचे. हे काम सोपे नाही. ओढाळ मनाला स्वरांच्या मखमली तंतूत गुंतवून ठेवणे कसब. त्यावर एखादा पाण्याचा थेंब अडकावा आणि सकाळचे हिवाळ्यातले कोवळे सोनेरी ऊन त्यावर पडावे. आपण त्या थेंबातून सात रंगांत येणारे ते सोनेरी सूर्यकिरण काही क्षण पाहावे आणि तेच विश्व समजून त्यात रममाण व्हावे, असा काहीसा अद्वैताचा हा खेळ असतो. कलाकार आपल्याबरोबर अगदी सहज मखमली पायघडीवरून श्रोता, दर्शकाला नेत असतो. शिवधनुष्य इंद्रधनुष्य होते.
ही ताकद कलाकारांच्यात असते. प्रभाताई केवळ संगीत नाही शिकल्या तर नृत्य शिकल्यात. विज्ञान आणि कायद्याच्या पदवीधर आहेत, तर संगीतात विद्यावाचस्पती आहेत. लय, ताल, सूर, शब्द आणि त्यामागचे विज्ञान जेव्हा केवळ समजत नाही, तर रोमारोमात भिनत तेव्हा स्वर नृत्य करतात, तालातून गीत उमटतं, पदन्यासाचे रंगीत गोफ विणले जातात, लय ओमकाराचे देवालय होते. हा सगळा प्रवास प्रभाताईंनी भाषणात तर सांगितलाच, मात्र हे गुरुचे पसाय शिष्य जेव्हा जपतो आणि समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अमूर्ताचे मूर्त आणि निर्गुण, निराकाराचे दर्शन अंतर्मनात होते. नवा सूर, जुन्या नाही, नव्या क्षितिजावर सापडतो. सापडावा अशी इच्छा निर्माण होते. क्षितिजापलीकडचे क्षितिज याचा अर्थ नवे नादब्रह्म !
प्रभाताईंनी मराठी व इंग्लिश भाषेत अनेक पुस्तके लिहिली. त्यांचे ‘स्वरमयी’ हे मराठीतील पहिले पुस्तक. संगीतावर आधारित निबंध व लेख त्यात आहेत. ह्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाची राजमान्यता मिळाली आहे. स्वरमयीप्रमाणेच त्यांच्या ‘सुस्वराली’ या दुसऱ्या पुस्तकालाही लोकमान्यतेचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यांच्या स्वरांगिणी व स्वररंजनी या मराठी भाषेतील पुस्तकांत त्यांनी रचलेल्या ५०० शास्त्रीय रागबद्ध रचना व लोकरचना आहेत. ‘अंतःस्वर’ हा त्यांनी लिहिलेल्या कवितांचा संग्रह आहे. ललित कलेच्या अनेक क्षेत्रांना केवळ स्पर्श नाही, तर त्यात मनोमन सहभागी होत त्यांनी त्यातले मर्म जाणले. पन्नास वर्षांहून जास्त काळ त्या कलेच्या विविध प्रवाहांत मुक्त संचार करीत आहेत.
आई, वडिलांच्या शिक्षणाच्या समर्थ वारशामुळे एकाच वेळी गुरु आणि शिष्य हे नाते त्यांनी सहज सांभाळलेले. जपले. त्यामुळे, कलाकारांनी झगमगत्या दुनियेतील कलाकारीपेक्षा कारागिराला जास्त महत्त्व आले आहे. कलाकाराने या दीपवून टाकणाऱ्या वाटेकडे न जात साधनेची वाट धरावी आणि स्वतःबरोबर श्रोत्यांना दिव्य आनंदाचा अनुभव द्यावा, अशी इच्छा त्या व्यक्त करू शकतात. त्यांना त्यांचा सूर गवसला आहे. असे सूर गवसलेली मंडळी फार थोडी असतात आणि असतात ते बेसुऱ्यांच्या वाटेला जात नाहीत, मात्र प्रभाताई अशांनाही आपल्या वाटेवर आणण्याचा प्रयत्न करतात.
त्या त्यांच्या कवितेत सांगतात, – या मार्गावर खुणावतो आहे एकच सूर दूरच्या क्षितिजावरचा साऱ्या साऱ्या नादविश्वाला सामावून घेणारा आणि भावबंधाने दरवळणारा तिथवरची वाट अडचणीची एकाकी वाटेवरचे दिवे फासे – मायावी वाट रोखणारे पुढच्या मार्गाचा विसर पाडणारे मात्र या झगमगाटात पाऊल उचलणारा स्वतःचा होता सूर दूरच्या क्षितिजावरचा…