भाकड बाबींवर चर्चा करून सामाजिक वातावरण दूषित करणे, समाजात भेद निर्माण करणे, विचारांना जळमटे लावून घेणे, हे करण्यापेक्षा यापुढे केवळ अशोक स्तंभ असलेलेच चलन निर्माण करावे आणि अशोकस्तंभाची आन-बान-शान कायम ठेवावी यासाठी प्रयत्न करावेत. एवढे केले, तरी आपण खूप काही अर्थपूर्ण केल्यासारखे होईल आणि त्याला पूर्ण अर्थसुद्धा प्राप्त होईल.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाडव्याच्या मुहूर्तावर आणि लक्ष्मीपूजनानंतर चलनावर लक्ष्मी आणि गणपती यांचे चित्र असावे असे सांगत दिवाळीनंतर आपट बार फोडला आहे. या बारचा प्रतिध्वनी काही दिवस ऐकू येत राहील. अण्णा हजारे यांच्या आंदोलकांपैकी काही आंदोलन फसलेले काही फसवणारे असे होते. फसवलेले आंदोलक आज निष्ठा, प्रामाणिकपणा या नावाखाली जगाला शहाणपण आणि उपदेश करण्याच्या भूमिकेत आहे. सरकार आणि विरोधी पक्ष या दोघांच्याही विरोधात राहण्यात त्यांना धन्यता वाटते. फसवणारे आंदोलन होते; त्यातल्या काहींनी राज्यपाल पदापासून मुख्यमंत्रिपदापर्यंत आणि एखाद्या गावापासून हे दोन दोन राज्यांपर्यंत आपला कार्यविस्तार करण्यात यश मिळवले आहे. अण्णांच्या या तयार विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यांत हुशार विद्यार्थी अरविंद केजरीवाल निघाले. समाजकारण किंवा राजकारण यांपैकी एक तुम्ही पारदर्शकपणे आणि प्रामाणिकपणे करू शकता.
या दोघांमध्येही अनेकदा अत्यंत धूसर सीमारेषा असतात. ही दोन्ही क्षेत्रे एकमेकांमध्ये कधी मिसळली हे समजतही नाही. कारण ती कुठे ना कुठे एकमेकांच्या केवळ बरोबर चालत असतात. राजकारण राजकारणाच्या पद्धतीने, तर समाजकारण समाजकारणाच्या पद्धतीने केले पाहिजे, हा अगदी मूलभूत, प्राथमिक नियम आहे. मात्र बौद्धिक सरमिसळ झालेली असते. त्यांना तो फरक लक्षात येत नाही. केजरीवाल यांनी राजकारण सध्याच्या राजकारण्यांच्या कार्यपद्धतीला अवलंबून सुरू केले आहे. काही वेळा ते त्यांच्या एक पाऊल पुढेही जातात. त्यातलाच एक भाग म्हणजे चलनावर म्हणजेच नोटांवर लक्ष्मी आणि गणपती यांचे फोटोचित्र असावे, अशी मागणी करणे हे होय. केजरीवाल हे प्रशासनात काम करत होते. अर्थकारणाशी निगडित असणाऱ्या खात्यातच ते उच्च अधिकारी होते. परदेशामध्ये त्यांनी या संदर्भात शिक्षणही घेतले आहे. त्याचा वापर त्यांनी आपला पक्ष मोठा व्हावा यासाठीही केला आहे. असे असताना अर्थशून्य असणाऱ्या गोष्टी आर्थिक बाबीत आणून केवळ वांझोट्या चर्चा घडवून आणायच्या, हे तंत्र विकसित करण्यामध्ये त्यांनी आपला महत्त्वाचा वाटा नोंदवला आहे.
एकीकडे रुपयाचे मूल्य घसरत आहे आणि डॉलर भक्कम होतो आहे; या वाक्यांच्या विश्लेषणाचा व्यत्यास मांडायचा आणि दुसरीकडे नोटांवर कोणाची चित्रे असावी यावर चर्चेचा धुरळा उडून द्यायचा. हे केवळ केजरीवालच करू जाणे. केजरीवाल यांच्या मागणीनंतर छत्रपती शिवाजीमहाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच नरेंद्र मोदी यांची चित्रेही चलनावर असावी अशा मागण्या होऊ लागल्या आहेत. कोणत्याही महामानवाचे छायाचित्र, चित्र चलनावर ठेवण्याऐवजी अशोक स्तंभाचे एकमेव चित्र सर्व चलनांवर असावे. कोणाची विटंबना होऊ नये, कोणाच्याही आदर्शांना धक्का लागू नये, याची काळजी नैतिकतेच्या पातळीवर आपण घेत नसू, तर चलनांवर या मंडळींचे चित्र ठेवून उपयोग तो काय? तेव्हा भाकड बाबींवर चर्चा करून सामाजिक वातावरण दूषित करणे. समाजात भेद निर्माण करणे, विचारांना जळमटे लावून घेणे हे करण्यापेक्षा यापुढे केवळ अशोक स्तंभ असलेलेच चलन निर्माण करावे आणि अशोकस्तंभाची आन-बान-शान कायम ठेवावी, यासाठी प्रयत्न करावेत. एवढे केले तरी आपण खूप काही अर्थपूर्ण केल्यासारखे होईल.