स्मरण | श्रीनिवास वारुंजीकर |
मेहदींचा ताजातवाना आवाज कानावर पडला व दोन्ही देशांमधील गझलप्रेमींनी त्यांना अक्षरश: डोक्यावर घेतले. धृपद व ख्याल अशा दोन्ही प्रकारांत त्यांनी गझल मांडल्या, ज्यामुळे रसिक त्यांच्यावर अक्षरश: फिदा झाले. त्यांच्याकडे चित्रपटगीत गाण्याचाही आग्रह झाला.
जन्माने भारतीय असलेल्या आणि गझल गायकीमधला अखेरचा शब्द मानल्या गेलेल्या मेहदी हसन हे एक जातिवंत कलाकार आणि शायरांच्या शब्दप्रामाण्यावर जिवापाड प्रेम करणारा हा फनकार अतिशय मस्तीत जगला आणि गझलेच्या प्रांतात त्याने नवनवे यशोसोपान चढले.
‘मला सूर दिसतात…’ असे मेहदी हसन नेहमी म्हणायचे. त्यांच्या गायकीमधले संगीत आणि आवाजातील माधुर्य हे त्यांच्या अस्तित्वाचाच भाग बनलेले होते. गझल या आशयाच्या दृष्टीने कठीण वाटणाऱ्या काव्यप्रकाराला संगीत क्षेत्रात प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचा मोठा हात होता.
ज्यांच्या जीवनाचा दु:ख हाच अविभाज्य भाग बनून राहिला होता, त्या मेहदी हसन यांनी गझलगायनाचा नवा अध्याय लिहिण्यात आपले आयुष्य खर्च केले. राजस्थानातील लुना गावात जन्मलेले मेहदी म्हणजे जातिवंत फनकार! उस्ताद अजीम खान यांचे पुत्र या नात्याने कलावंतांच्या १६ व्या पिढीचा वारसा घेऊन ते जन्माला आले. वडिलांप्रमाणेच त्यांना काका उस्ताद इस्माइल खान यांच्याकडूनही गायनाचे धडे मिळाले. हे दोघेही ख्यातनाम धृपदगायक होते. भारताच्या फाळणीमुळे उभय देशांतील जी कुटुंबे उद््ध्वस्त झाली, ज्यांना कित्येक पिढ्यांचा वारसा सोडून देशच बदलावा लागला, त्यापैकीच मेहदींचे कुटुंब एक होते.
फाळणीचा धुरळा पूर्ण बसल्यानंतर उभय देशांची घडी व्यवस्थित बसत गेली आणि त्याच वेळी मेहदींना त्यांचा हरवलेला सूर गवसला. कर्णोपकर्णी त्यांची महती पसरत गेली. १९५२ मध्ये पाकिस्तान रेडिओवरून त्यांना गायनाची संधी मिळाली.
धृपदगायनाच्या त्यांच्या शैलीने त्यांना रसिकांपर्यंत पोहोचवले. मेहदींनाही उर्दू काव्यात रस होता. त्यामुळे त्यांनी हळूहळू गझलगायनाला सुरुवात केली. हृदयाच्या अंतरंगात शिरून मछनातील कोमल भाव-भावनांना जोजवणारी त्यांची अप्रतिम संगीतरचना, खर्जाचा परिपाक असला तरीही अप्रतिम असा मधुर गळा आणि शब्दफेकीच्या अप्रतिम शैलीमुळे अल्पावधीतच त्यांनी गझलप्रेमींच्या हृदयाचा ठाव घेतला.
सन १९५० ते ६० च्या दशकात गझलची लोकप्रियता शिखरावर पोहोचली होती. भारतात आणि पाकिस्तानातही तरुण मंडळी रेडिओभोवती बसून गझलचा आनंद लुटत असत. नवस्वातंत्र्याच्या त्या मंतरलेल्या वातावरणात मेहदींचा ताजातवाना आवाज कानावर पडला आणि दोन्ही देशांमधील गझलप्रेमींनी त्यांना अक्षरश: डोक्यावर घेतले. धृपद आणि ख्याल अशा दोन्ही प्रकारांत त्यांनी गझल मांडल्या, ज्यामुळे रसिक त्यांच्यावर अक्षरश: फिदा झाले. त्यानंतर त्यांच्याकडे चित्रपटगीत गाण्याचाही आग्रह झाला आणि बघता-बघता ते पार्श्वगायक म्हणूनही नावारूपाला आले.