हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा

विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता : विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यातील उस्मानाबाद, नांदेड, लातूर या जिल्ह्यांच्या तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांतील लोकांना काळजी घेण्याचे आवाहनही हवामान विभागाने केले आहे.

मुंबई : यंदा वेळेआधीच मान्सून दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. तीव्र उन्हाळा अनुभवल्यानंतर आता गारव्याची चाहूल लवकर मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, अंदमानात मोसमी पावसाचे आगमन झाले असून, सहा दिवस आधीच मोसमी पाऊस अंदमानात पोहोचला आहे.

त्यामुळे तो केरळमध्ये आणि त्यानंतर काहीच दिवसांत महाराष्ट्रात दाखल होणार आहे. गुरुवारी मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद, कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

२० आणि २१ मे रोजी विदर्भातील नागपूर, वर्धा, अकोला, यवतमाळ जिल्ह्यांत एकदोन भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. आग्नेय अरबी समुद्रात वादळी वार्‍याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातही नैर्ऋत्य मोसमी वारे लवकरच धडकण्याची चिन्हे आहेत. राज्यातील काही भागांत जोरदार वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. सातारा, सांगली, कोल्हापूर येथे सोसाट्याच्या वार्‍यासह काही ठिकाणी पाऊस झाला आहे.

उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी वगळता इतरत्र पावसाची नोंद करण्यात आली नाही. सर्वाधिक कमाल तापमान वर्धा येथे ४५ अंश सेल्सिअस, तर सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे १८.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवस राज्यातील विविध भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. येत्या चार-पाच दिवसांत, २१ मेपर्यंत दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच सुमारास मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी उष्ण लाट येण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Dnyaneshwar: