ग्रामीण भागातील तरुणांनी मेट्रोसिटीच्या मुख्य प्रवाहात येणे गरजेचे

इंदापूर : ग्रामीण भागातील तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी, त्यांचे भवितव्य उज्ज्वल घडविण्यासाठी शिक्षणाबरोबरच त्यांना प्रत्येक गोष्टीतील सखोल माहिती व योग्य ज्ञान मिळाले पाहिजे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योग, व्यवसाय व नोकरी करण्यासाठी ग्रामीण भागातील तरुणांनी मेट्रोसिटीसारख्या शहरांच्या मुख्य प्रवाहात येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पुणे जिल्हा रोट्ररॅक्ट प्रतिनिधी पार्थ जावोकर यांनी केले.

इंदापूर येथे क्लब ऑफ इन्द्रेश्वरच्या वतीने शनिवारी (दि. २३) शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या सभागृहात तरुणांना ‘व्यक्तिमत्त्व विकास मार्गदर्शन’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा विभागप्रमुख संकेत जैन, प्रभारी विभागप्रमुख इशिका धर, विभागप्रमुख कैझन नाथनी, रोट्ररॅक्ट क्लब ऑफ इन्द्रेश्वरचे अध्यक्ष सागर शिंदे, सचिव विश्वास गाढवे, मच्छिंद्र किरकत, अमोल राऊत उपस्थित होते. यावेळी जावोकर बोलत होते.

पुढे बोलताना पार्थ जावोकर म्हणाले की, ग्रामीण भागात व शहरात अनेकविध खासगी, शासकीय व निमशासकीय संस्था आहेत. मात्र देशाचे भविष्य ज्यांच्या हातात आहे, त्या तरुणाईला या संस्थांचे कामकाज व कार्याबाबत माहिती करून घेणे गरजेचे आहे. कारण संस्थेचा कारभार व संस्था कशी चालवली जाते, याची सखोल माहिती घेतल्यास, तरुणांना भविष्याचा अचूक वेध घेता येईल व आयुष्याला गती प्राप्त होईल, असा मोलाचा सल्ला यावेळी जावोकर यांनी दिला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इन्द्रेश्वर रोट्ररॅक्ट क्लबचे व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षक अमोल राऊत, मच्छिंद्र किरकत, ज्ञानेश्वर वलेकर, सचिन चौगुले, गायत्री झगडे, अमोल आवटे, अस्मिता किरकत, रोहित साळुंखे यांनी परिश्रम घेतले.

admin: