पुणे: मिलेनियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचाराची न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे, हे प्रकरण लवकरात लवकर मार्गी लागावे आणि आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी सरकारी वकिलांच्या दिमतीला आता आणखी पाच वकिलांची फौज देण्यात आली आहे.त्यामुळे आता हे प्रकरण ‘ फास्ट ट्रॅक’वर चालविले जाण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
सरकारी वकिलांना मदत व्हावी यासाठी आम्हाला या प्रकरणात सह सरकारी वकिल म्हणून नियुक्त करावे, असा अर्ज या पाच वकिलांनी न्यायालयाला सादर केला होता. त्यानुसार न्यायालयाने ॲड. मंदार जोशी, ॲड. सुरेखा भोसले, ॲड. राणी कांबळे, ॲड. जयश्री बीडकर आणि ॲड. महेश रानवडे यांची नियुक्ती केली असून त्यांना तसे पत्र देण्यात आले आहे.
यासंदर्भात बोलताना ॲड. मंदार जोशी म्हणाले; हा खटला अधिक जलदगतीने आणि इन कॅमेरा चालावा यासाठी आमच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून न्यायालयाला आम्हाला नियुक्त करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्याला न्यायालयाने मान्यता दिली असून या गुन्ह्यातील आरोपीला अधिकाअधिक कडक शिक्षा व्हावी असा आमचा प्रयत्न असणार आहे.
पालक त्यांच्या मुलांना मोठ्या विश्वासाने शाळेत पाठवित असतात, त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना धीर देण्याची आणि त्यांचा योग्य रीतीने सांभाळ करण्याची जबाबदारी ही शाळा प्रशासनाचीच आहे. त्यासाठी शाळा प्रशासनाने प्रत्येक शिक्षकांची नेमणूक करताना त्यांची पार्श्वभूमी तपासण्याचे गरज असून त्यांची मेडिकल टेस्टही करण्याची आवश्यकता आहे. अत्याचारग्रस्त महिलांसाठी सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे, त्याच धर्तीवर पिडित मुलांना धीर देण्यासाठी आणि अशा विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी शासन पातळीवरुन हालचाली सुरु कराव्यात अशी मागणीही ॲड. जोशी यांनी केली.