पुणे ः सृष्टीवरील वाढत्या तापमानामुळे भविष्यात जवळपास ४० टक्के शेतीचे उत्पादन, मासे आणि दूध कमी होईल. पण वाढत जाणार्या जनसंख्येला काय परिणाम भोगावे लागतील याची कल्पना करणेही अवघड आहे. जल ही जीवन है, हे लक्षात ठेवून देशातील सर्व नद्यांच्या किनार्याला बांबूची लागवड करून तापमानाला नियंत्रित करावे. तसेच नदी वाचविणे व ऑक्सिजनची मात्रा वाढविण्यासाठी सर्वांनी समोर यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीच्या सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च अंतर्गत आयोजित ‘पुणे सिटिझन्स क्लायमेट मॅनिफेस्टो’ कार्यशाळेचे उद्घाटन झाले.
पर्यावरण हे प्रत्येक व्यक्तीशी जुळलेले आहे; परंतु आधुनिकतेच्या काळात याचा मोठा र्हास होताना दिसतो. डॉ. विश्वनाथ कराड सतत पर्यावरण रक्षण आणि विश्वशांतीसाठी कार्य करीत आहेत. युवकांनी आता पर्यावरण संरक्षण आणि वसाहतीवादी मानसिकता सोडण्यावर भर द्यावा. इंडियाला भारत असे संबोधावे.
_राहुल कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष
कार्बन डायऑक्साइडमुळे वाढणारे जागतिक तापमान व हवामान बदलाच्या समस्या वरील विषयाचा उल्लेख हिंदू धर्मामध्ये सापडतो. त्यामुळे प्रत्येकाने ऑक्सिजनची मात्रा अधिक सोडणार्या वृक्षांची जोपासना करावी. वड, पिंपळ आणि बांबू सारख्या वृक्षांची लागवड करावी. सृष्टी वाचविण्यासाठी प्लास्टिकचा वापर बंद करून बांबूपासून निर्मित वस्तूंचा वापर वाढवावा, असा पर्यावरणपूरक मंत्रच जणू पाशा पटेल यांनी दिला.
भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत म्हणाले, पर्यावरणाच्या र्हासामुळे सृष्टीचा विनाश होईल या भीतीपेक्षा सर्वांनी संरक्षणासाठी पावले उचलावीत. समाज जागृती करून कार्य करावे. गावागावांमध्ये निवडणुकीच्या काळामध्ये बाहेर येणार्या पैशांचा उपयोग हा पर्यावरण संरक्षणावर खर्च करावा.