“…तर चून चून के मारेंगे”, शिंदे गटातील आमदाराचं भडकाऊ वक्तव्य!

बुलढाणा | Sanjay Gaikwad On Shivsena Workers – काल (शनिवार) बुलढाण्यात शिवसेनेच्या सत्कार समारंभात शिंदे गट आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. या राड्यानंतर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बोलाल तर चून चून के अन् गिन गिनके मारेंगे” अशी धमकी संजय गायकवाड यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे. तसंच ज्या लोकांना प्रेमाची भाषा कळत नाही, त्यांच्यासाठी हीच भाषा वापरणार, असंही गायकवाड म्हणाले. खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे, असा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे.

शनिवारी बुलढाण्यात शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला होता. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हाप्रमुख संजय हाडे यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांना धक्काबुक्की करण्यात आली. खेडेकर यांनी हल्ला करणाऱ्यांमध्ये आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड तसंच त्यांचे सहकारी आघाडीवर होते, असा आरोप केला आहे. 15 मिनिटे चाललेल्या या राड्यात कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची फेकाफेक करत लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण केली. या घटनेनंतर गायकवाड यांनी धमकी दिली आहे.

यावेळी गायकवाड म्हणाले, “शनिवारी झालेल्या राड्यात पोलिसांनी मध्यस्थी केली नसती तर तेव्हाच हिशोब चुकता केला असता. ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि नेते पातळी सोडून बोलत आहेत. पण त्यांना माहिती नाही की संजय गायकवाडांचे कार्यकर्ते किती भयानक आहेत. ते आम्हाला घरात घुसून मारण्याची धमकी देतात पण ते आता जर शिंदे विरोधात बोलले तर आम्ही त्यांना चून चून के अन् गिन गिनके मारेंगे”, असा धमकीवजा इशाराही संजय गायकवाड यांनी दिला आहे.

Sumitra nalawade: