पोलादपूर | MLA Yogesh Kadam Accident – गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघात (Accident) होण्याचं सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गाडीला अपघात झाला होता. अशातच आता शिंदे गटाचे आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. योगेश कदम यांच्या गाडीला रात्री सव्वादहाच्या सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे रायगड हद्दीत अपघात झाला आहे.
योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले होते. त्यावेळी कशेडी घाटात पोलादपूर नजीक चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरनं त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यानंतर टँकरचालक पळून गेल्याची माहिती आहे. तसंच योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्यानं त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या पोलीस गाडीवर धडकली. यामध्ये कदम यांच्या गाडीचं मागच्या बाजूचं नुकसान झालं आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
या अपघातात योगेश कदम सुखरूप आहेत. तर त्यांच्या चालकाला मात्र किरकोळ दुखापत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच त्यांना चोळई येथील शासकीय रूग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, योगेश कदम हे खेड दापोली-खेड-मंडणगड मतदारसंघातून आमदार आहेत. तसंच ते माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे पुत्र आहेत.
View Comments (0)