मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) पठाण (Pathan) चित्रपट आज प्रदर्शित झाला. वाद-विवादांना मात देत शाहरुखच्या या चित्रपटानं पहिल्या दिवशी धुमाकूळ घातला आहे. पण या चित्रपटांमुळं मराठी चित्रपटांच्या शोजला कात्री लावण्यात आल्याचं दिसून आलं. त्यामुळं आता मराठी चित्रपट विरुद्ध पठाण असं चित्र दिसत आहे. यावर आता मनसेचे (MNS) चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पठाणमुळे (Pathan) मराठी चित्रपटांना शोज मिळत नसल्याची तक्रार अमेय खोपकर यांनी केली आहे. त्यांनी थेट मल्टिप्लेक्स चालकांना इशारा दिला आहे.
यावर अमेय खोपकर म्हणाले, “आम्हाला दर गुरुवारी हा विषय घेऊन आंदोलन करण्याची वेळ येते. महाराष्ट्रात मराठी सिनेमे लावा, या विषयावरून आंदोलन करावं लागणं ही शरमेची बाब आहे. आमचा पठाणला विरोध नाही, शाहरुखचा कमबॅक चित्रपट आहे. तो लोकांनी बघावा हे मान्य. पण त्याच बरोबर चार आठवड्यांपूर्वी रितेश देशमुखचा (Ritesh Deshmukh) वेड (Ved) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार चालला. त्याने 60 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. वाळवीलाही चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यानंतर तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) निर्मित बांबू (Bamboo) हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. या सिनेमांसाठी स्क्रीन्स आणि थिएटर तर सोडा, पण तिकिट बुकिंगचं काऊंटरदेखील उघडलं नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
पठाणला विरोध नाही पण,…
पठाणला विरोध नाही, पण मराठी चित्रपटांना त्यांच्या वाट्याचे स्क्रिन्स आणि थिएटर्स मिळायला हवेत, असंही खोपकर म्हणाले. मल्टीप्लेक्स चालकांनाही हे समजायला हवं, नाही तर आम्ही येऊन ‘बांबू’ लावू असा इशारा खोपकरांनी दिला आहे.