मुंबई | Jayant Patil On Raj Thackeray | मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) राष्ट्रवादीवर (NCP) आणि सोबतच शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तसंच राष्ट्रवादी आणि मनसे नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू असतातच. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर खोचक शब्दात निशाणा साधला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा घराघरात पोहोचेल इतका मोठा पक्ष नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरूवारी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केलं होतं. तसंच मनसैनिकांनी हे पत्रक घराघरापर्यंत पोहचवावं, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं होतं. यावरुनच जयंत पाटलांनी मनसेवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष घराघरापर्यंत पोहचेल इतका मोठा नाही. त्यांनी जे पत्रक काढलं आहे ते कुठपर्यंत पोहचतंय त्याला कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो, हे पाहून बोलेन. असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
दरम्यान, मनसे प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी जयंत पाटील यांच्यावर पलटवार केला आहे. “आमच्यावर बोलण्यापेक्षा स्वत:चा पक्ष २ जिल्हाभर कसा वाढेल, हे पहा. जयंत पाटलांच्या राष्ट्रात हा पक्ष फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये आहे. विधानपरिषदेच्या बाहेर जयंत पाटलांनी ५ हजार लोकं जमा करुन दाखवावीत. चार खासदार आणि आपण पंतप्रधान (Prime Minister) होण्याची स्वप्न बघता? पाटील साहेब खूप जास्त बोलत आहेत,” असं गजानन काळे म्हणाले.