अमृता फडणवीसांना लाच देण्याचा प्रकार, देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत खुलासा; म्हणाले, “मला अडचणीत आणण्यासाठी…”

मुंबई | Devendra Fadnavis – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना लाच आणि धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी डिझायनर अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरोधात मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आज (16 मार्च) देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत खुलासा केला आहे. मला अडचणीत आणण्यासाठी हा ट्रॅप केलाचा दावा, फडणवीसांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अनिल जयसिंघांनी नावाचा एक व्यक्ती आहे. तो जयसिंघांनी सात आठ वर्ष झालं फरार असून त्याच्यावर 14 ते 15 गुन्हे दाखल आहेत. त्याची एक मुलगी 2015-16 दरम्यान पत्नी अमृता फडणवीस यांना भेटत होती. त्यानंतर काही दिवसांनी तिनं भेटणं बंद केलं होतं. मग 2021 साली तिनं पुन्हा अमृता यांना भेटणं चालू केलं. तेव्हा तिनं अमृता फडणवीसांना सांगितलं की, मी डिझायनर असून मी कपडे आणि दागिने तयार करते. तसंच अमृता यांचा विश्वास संपादन करण्यासाठी तिनं तिच्या आईचं एक पुस्तकही प्रकाशन करून घेतलं होतं.”

“काही दिवसांनंतर या मुलीनं तिनं डिझाईन केलेले कपडे वापरण्याची विनंती अमृता फडणवीसांनी केली. त्यातून तिनं विश्वास संपादन केला. त्यानंतर तिनं अमृता यांना सांगितलं की, माझ्या वडिलांना चुकीच्या केसेसमध्ये अडकवलंय. त्यामुळे तुम्ही त्यांना त्यातून सोडवा. तिनं या गोष्टी राज्यातील सरकार बदलल्यानंतर सांगितलं. मग माझ्या पत्नीनं त्या मुलीला तुझं काही निवेदन असेल तर ते मला देण्यास सांगितलं. त्यानंतर त्या तिनं माझे वडील काही बुकीजला ओळखतात. ते बुकीजला माहिती द्यायचे. यामध्ये रेड पडायच्या आणि त्यातून आम्हाला दोन्हीकडून पैसे मिळायचे असंही त्या मुलीनं अमृता फडणवीसांना सांगितलं. तसंच जर तुम्ही आम्हाला मदत केली तर आपणही अशा रेड कंडक्ट करु असे त्या मुलीनं सांगितलं. यावेळी अमृता यांनी हे आमचं काम नसल्याचं सांगत अशा गोष्टीशी आमच्याशी करायच्या नाहीत असं सांगितलं.

काही काळानंतर त्या मुलीनं तिच्या वडिलांना सोडवण्यासाठी एक कोटी रुपये देण्याची ऑफर केली. माझ्या वडिलांना सोडून द्या असं तिनं अमृता फडणवीसांना सांगितलं. त्यानंतर अमृता यांनी स्पष्ट सांगितलं की, जर ते चुकीच्या पद्धतीनं अडकले असतील तर त्यांना सोडवता येईल. याबाबत मला काही सांगू नको असं अमृता फडणवीसांनी सांगितलं. त्यानंतर अमृता फडणवीसांनी त्या मुलीला फोनवर ब्लॉक केलं. त्यानंतर अमृता यांना काही दिवसांनी अनोळखी नंबरवरुन काही व्हिडीओ क्लिप आल्या. त्यामध्ये अमृता फडणवीस आणि त्या मुलीचं संभाषण होतं. यातील काही व्हिडीओमध्ये ती मुलगी हार घालत होती तर काहीमध्ये अंगठी घालत होती, तसंच ते परत केल्याचंही दिसत आहे. तर एक गंभीर व्हिडीओ असा दिसला की एक बॅग आहे, त्यात ती पैसे भरत असल्याचं दाखवण्यात आलंय. तर दुसऱ्या व्हिडीओत तशीच बॅग ती मुलगी आमच्या घरी काम करणाऱ्या बाईला देते. हे व्हिडीओ पाठवत एका व्यक्तीनं धमकी दिली आहे. हे व्हिडीओ टाकले तर तुमच्या नवऱ्याची नोकरी जाईल. सगळ्या पक्षाशी माझे संबध आहेत. त्यामुळे आम्हाला तुम्ही तात्काळ मदत करा. आमच्या केसेस क्लिअर करा, असं अमृता फडणवीसांना सांगण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

या प्रकारानंतर आम्ही पोलिसांना सांगितलं. त्या सगळ्या व्हिडीओंची तपासणी करून यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं समोर आलंय. त्यानंतर त्या मुलीनं सर्व गुन्हे परत घ्यायचे होते म्हणून हे सगळं केल्याचे सांगितलं. त्या मुलीनं काही नेत्यांची, पोलिसांचीही नावे घेतली. आमच्या केसेस परत घेण्याची कारवाई मागील सीपींच्या काळात सुरु झाली होती. पण तुमचं सरकार आल्यावर ती कारवाई थांबली असं त्या मुलीनं सांगितलं. यावेळी तिनं आम्हाला हे सगळं करायला सांगण्यात आल्याची हिंट दिली होती असं सांगितलं. त्या मुलीनं दिलेल्या हिंटप्रमाणे असं दिसतंय की मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याआधीही मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, यासंदर्भात पोलिस तपास करत असून त्या व्यक्तीला पोलीस शोधत आहेत.

Sumitra nalawade: