नवी दिल्ली | Parakram Diwas 2023 – नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhas Chandra Bose) यांची आज (23 जानेवारी) 126 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज अंदमान आणि निकोबारमधील (Andaman and Nicobar) 21 मोठ्या बेटांचं नामकरण केलं आहे. त्यामुळे आता ही बेटे परमवीर चक्र विजेत्यांच्या (Param Vir Chakra) नावानं ओळखली जातील. यावेळी पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभाग घेतला होता. तसंच गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) नेताजींच्या 126 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोर्ट ब्लेअरला पोहोचले आहेत.
पंतप्रधानांनी ऑनलाईन उद्घाटन केल्यानंतर देशाला संबोधित केलं. ते म्हणाले की, अंदमान आणि निकोबारमधील ही 21 बेटं आता परमवीर चक्र विजेत्यांच्या नावानं ओळखली जाणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या पिढ्या हा दिवस स्वातंत्र्याच्या अमृताचा एक महत्त्वाचा अध्याय म्हणून लक्षात ठेवतील. आपल्या पुढच्या पिढ्यासांठी ही बेटं चिरंतन प्रेरणास्थान असतील. यासाठी मी सर्वांचं अभिनंदन करतो.
पुढे मोदी म्हणाले की, अंदमानच्या या भूमीत पहिल्यांदाच आकाशात मुक्त तिरंगा फडकवला गेला. आजही त्या अभूतपूर्व उत्कटतेचे आवाज आजही सेल्युलर जेलच्या कोठडीतून अपार वेदनांसोबत ऐकू येतात. स्वातंत्र्यानंतर नेताजींना विसरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हे स्मारक येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. खरं तर 23 जानेवारी हा दिवस नेताजींच्या जयंतीनिमित्त ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा केला जातो.