पुणे/मुंबई/दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र पिंजून काढत आणि राष्ट्रीय पातळीवर भारतीय जनता पक्षाविरोधातील पक्षांची मोट बांधत आघाडी करण्यास सुरुवात केली आहे. ही कदाचित तिसरी आघाडी असेल अथवा काँग्रेसला बरोबर घेऊन दुसरी. केंद्रातील भाजचचे मोदी सरकार हटविण्याचा त्यांनी चंगच बांधला आहे. शरद पवार एकूणच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी अॅक्शन मोडवर आले आहेत.
‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाआघाडी सरकारच्याविरोधात दोन सभा घेतल्या. दुसर्या सभेत त्यांनी थेट शरद पवार यांना लक्ष्य केले. त्यांच्यावर विविध आरोप करीत, शरद पवार यांच्या दिसणार्या राजकीय भूमिकांमागील चेहरा स्पष्ट करण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केला. यावर उत्तर न देणे धोकादायक होते आणि त्यासाठी शरद पवार सक्रिय झाले. त्याचबरोबर गेल्या दोन दिवसांत सुमारे ११ मुख्यमंत्र्यांशी मोबाईलवरून चर्चा करीत काँग्रेस नसेल, तर तिसरी आणि काँग्रेससह दुसरी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांना त्यांनी वेळ दिला आहे. मूलतः आपल्या आघाडीबरोबर काँग्रेस पक्ष असलाच पाहिजे, ही त्यांची तात्त्विक भूमिका आहे. काँग्रेसशिवाय भारतीय जनता पक्षाच्याविरोधात इतरांची आघाडी फारशी सक्रिय होऊ शकणार नाही. तिला ताकद मिळणार नाही, अशा अंदाजाने त्यांनी काँग्रेस बरोबरच असली पाहिजे, या मुद्यांसह अकरा मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू केली आहे. निवडणुकीपर्यंत यामध्ये घट होईल अथवा वाढ होईल. मात्र, लोकसभेची निवडणूक भाजपविरोधातील सर्वांना एकत्र घेऊन लढली तर भाजपचा वारू रोखता येईल, या मतावर ते ठाम आहेत.
ममता बॅनर्जी, शरद पवार हे थेटपणे या आघाडीचे दिसणारे चेहरे आहेत. याशिवाय या आघाडीत सक्रिय होणारे आणि स्वतःच्या महत्त्वाकांक्षा प्रत्यक्षात आणणारे अजून काही चेहरे यथावकाश समोर येतील. या आघाडीत महत्त्वाचा मुद्दा असेल तो अध्यक्षपदाचा आणि हे अध्यक्षपद काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे असावे की इतर कोणाकडे? असे म्हणत असताना, शरद पवार यांच्याकडे असावे, असा सांगणारा एक गट ते नक्कीच आपल्या पाठीशी उभा करतील. याचाच अर्थ शरद पवार राष्ट्रीय राजकारणावरही सक्रिय
झाले आहेत.
त्याचबरोबर अमरावती, जळगाव येथील पत्रकार परिषदा आणि सभा तसेच कोल्हापूर येथे अनेक प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी ते जाहीर सभांतून सज्ज झाले आहेत. शरद पवार माध्यमांशी सध्या मोकळेपणाने बोलत आहेत. त्यांच्या पत्रकार परिषदेत ते कोणत्याही प्रश्नावर न चिडता उत्तरे देत आहेत. एका दीर्घ पल्ल्याच्या खेळीला शरद पवार प्रारंभ करीत आहेत आणि त्याची सुरुवात त्यांच्या सक्रिय होण्यातून दिसत आहे. संजय राऊत यांचा पुढाकार केंद्रातील सत्ताधारी एनडीएच्या विरोधात यूपीए संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षपद शरद पवार यांनी स्वीकारावे, अशी घोषणा पूर्वीच शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केली होती. तथापि, त्याला काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध केला होता आणि हे अध्यक्षपद आधीच सोनिया गांधी यांच्याकडे आहे, हे स्पष्ट केले होते.
परंतु काँग्रेस पक्षाला सोडून आघाडी करणे शरद पवार यांना मान्य नाही, काँग्रेस पक्षाला बरोबर घेऊनच मोदी यांना विरोध करण्यास मोठी ताकद मिळेल, असे त्यांनी स्पष्ट मत यापूर्वीच वर्तविले आहे. यूपीएमधील अन्य काही घटकपक्ष शरद पवार यांना विरोध करण्याची शक्यता आहे. या घटकपक्षांच्या प्रमुखांनीदेखील यूपीएचे अध्यक्षपद स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, चंद्रशेखर राव यांचा समावेश आहे. शरद पवार यांच्या म्हणण्यानुसार, आधी सर्वांनी मोदी सरकारच्याविरोधात आघाडी करावी आणि नंतर नेता निवडावा. मात्र मोदी हटाव मोहीम राबवायची असेल तर सर्व विरोधकांनी एकत्र यावेच लागेल, अशी भूमिका शरद पवार वारंवार स्पष्ट करीत आहेत