मधुसूदन पतकी
सावळा रंग हा गुढ रंग.कृष्णाचा रंग सावळा.त्याच्या व्यक्तीमत्वाचा थांग लागत नाही.श्रीरामाचा अंदाज येत नाही.असं काही हवहवसं गुढ त्याचं आपल्याला आकर्षण असतं. नाही का ?
गुलजार या गीतकाराचा हळवा चाहता वर्ग. गाणीही तशीच हळवी. अलवार. शब्द नि अर्थ मिसळलेले. आशयाला मखमली वेष्टण. त्याला सोनेरी किनार. एक एक गाणं सुरांना, शब्दांना न्याय देतं. एक सुंदर स्वरावली मनात घोळत रहाते. एस.डी. बर्मन गाण्यात जीव ओततात. नूतन चैतन्य. लताची एकामागोमाग एक आवर्तनं. स्वर, सुरांची मधुर, हवीहवीशी झुळूक आपल्या थेट काळीज कप्प्यात. बंदिनीमधलं मोरा गोरा अंग लै ले.. मोहे शाम रंग दै दे… निव्वळ गारूड. गुलजार यांचे चित्रपटातलं हे पहिलं गाणं, या पहिल्या गाण्याने त्यांनी रसिकांच्या मनात प्रवेश केला. आजही त्यांचं स्थान अबाधित, गुलजार यांची शायरी हा लेखनाचा स्वतंत्र विषय. कोणालाही त्याला आवडती दहा गाणी काढायला सांगितली तर त्यात गुलजारचं गाणी नक्कीच. वाद नसावा. पट्टीचा श्रवणभक्त गुलजारप्रेमी असणार. अनेक चित्रपट त्यांच्या गाण्यांनी सजलेले. दिग्दर्शन, कथा. पटकथा. संवाद. यापलीकडे एक गीतलेखक. गीतकार कवी असतो? हा प्रश्न चित्रपटात गाणी लिहायला सुरू झालं तेव्हा पासूनचा. म्हणजे वृत्तपत्रात अग्रलेख, स्फुट लिहिणारा लेखक असतो? तसंच काहीसं. मात्र गुलजार यांनी दोन्ही पात्रता सहज पार केलेल्या. अर्थात त्यांच्यासाठी पात्रता परीक्षा आवश्यक आहे? तर बंदिनीतलं हे गीत. त्यांचं हे पहिलं गीत. अल्लड, भोळीभाबडी पण प्रियकराला भेटायला आतूर असलेल्या युवतीची निर्मळ भावना दर्शवणारं.
माझा गोरा रंग घेऊन टाक आणि मला सावळा रंग दे असं विनवणारी प्रेमिका. ही विनवणी चंद्राकडे करते ती. चंद्राचं आणि प्रेमी जीवांचं नातं नेहमीच सौहार्दाचं, घट्ट, एखादी मागणी हक्काने करावी असं. इतकं जवळचं. ही बापडी त्याला आपला गोरा रंग देण्याची आणि श्याम रंग तिला त्याने द्यावा अशी मागणी करते. यामुळं मी त्याला भेटायला जाताना दिसणार नाही कोणाला असं तिचं म्हणणं. या रंगामुळं तिला तिच्या प्रियव्यक्तीला मनसोक्त भेटता येईल. खरंतर एकीकडे त्याला भेटायला जाणं म्हणजे लाजायला होतं. जाऊ का नको असं वाटतं, पण त्याला भेटायचा मोह इतका होतो की, माझ्या नकळत त्याच्याकडे ओढली जाते. पण तो आहे कुठं? आणि मी जाते कुठं? कोणी सांगा मला. माझी अवस्था तो चंद्र पहातो. ढगांना हळूच बाजूला करून. गालात हसत. आता माझी अवस्था काही हरवलंय काही मिळवून तर काही सापडलंय काही गमवून अशी. बावरली आहे. गोंधळली आहे. समजत नाही काय करावं. काय करू नये. मन चंचल. त्यात आता ते उतावीळ झालंय. ते कुठं घेऊन जाणार? कोणास ठाऊक? पण माझा गोरा रंग तेवढा घेऊन टाका आणि मला सावळा रंग, काळोखात मिसळणारा द्या हो. भेटायचंय ना मला त्याला. अत्यंत मधुर असं गीत आणि अभिनय. शब्द आणि सुरावट. हळूहळू उलगडत जाणारी तिची भावावस्था.
जाता जाता सावळा रंग हा गूढ रंग. कृष्णाचा रंग सावळा. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा थांग लागत नाही. श्रीरामाचा अंदाज येत नाही. असं काही हवंहवंसं गूढ त्याचं आपल्याला आकर्षण असतं. नाही का?