ट्रॅडिशनल वेअरसोबत हटके लूक
पारंपरिक राजस्थानी मोजडी सर्वांना आकर्षित करते. कालपर्यंत शाही मंडळी परिधान करीत असलेली मोजडी आजकाल सर्वच जण परिधान करतात. ट्रॅडिशनल वेअरसोबत हटके लूक करण्याबाबत मोजडीचा हमखास वापर करतात.
फॅशनच्या या जमान्यात मोजडीच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतीय तरुणांबरोबरच विदेशी पर्यटकांनाही मोजडी आवडते. खास करून पारंपरिक राजस्थानी मोजडीचे मुख्य आकर्षण सर्वांनाच आहे.
मोजडी हा बुटांचा प्रकार राजस्थान, गुजरात आणि पंजाब या ठिकाणी सर्वात जास्त वापरला जातो. विविध राज्यांमध्ये त्याला विविध नावाने ओळखले जाते. पंजाबमध्ये याला ‘जुती’ म्हटले जाते. गुजरात आणि राजस्थान या भागांकडे त्याला ‘मोजडी’ असे म्हटले जाते. मोजडीचा इतिहास जुना आहे.
मोजडी म्हटल्यावर तुमच्या डोळ्यांपुढे टीपिकल चामड्याचे किंवा वेलवेटचे असे शूज येतात. मुघलांच्या काळात चामड्यापासून बनवल्या जाणाऱ्या बुटांवर रत्न आणि सोन्या-चांदीच्या धाग्यांनी सुंदर कलाकुसर केली जायची. आजही अनेक ठिकाणी त्यांच्या मोजडी जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. मुघल राजा सलीम शाहा यांच्या कालखंडात या बूटांचा अधिक वापर केला जायचा. म्हणूनच त्याला ‘सलीम शाही’ म्हटले जाते. आता हा प्रकार पुरुष आणि महिला दोघांनाही वापरता येण्यासारखा आहे. याचे वैशिष्ट्य असे की, याला डावी-उजवी अशी घालता येते. विशेष म्हणजे या मोजडी हाताने शिवलेल्या असतात.
अशा पद्धतीने करा मोजडीची स्टायलिंग
जीन्ससोबत कुर्ती घालण्याची फॅशन आहे. मग मोजडीसोबत हा लूक खूप सुंदर आणि स्टायलिश दिसू शकेल.
चुडीदार किंवा साध्या पायजम्यावर घालायला सोपी आलेली हाफ मोजडी छान दिसते.
गरारा किंवा पलाझो पँटसोबत राजस्थानी मोजडी घालता येऊ शकते.
पुढून गोलाकार असलेली मोजडी चुडीदार किंवा तुमच्या लांब स्कर्टवर चांगली दिसते.
पुढे टोकदार असलेली राजस्थानी मोजडी अनारकली ड्रेसवर उठून दिसते.
हल्ली मोजडी वेगवेगळ्या मटेरिअलमध्ये मिळतात. लेदर, वेलवेट, कापड असे अनेक प्रकार मिळतात. याशिवाय तुमच्या दररोच्या वापरासाठी किंवा कार्यक्रमांसाठी मोजडी हवी असेल तर तशी कलाकुसरही केलेली मिळते. तुमचा ड्रेस अगदी साधा असेल आणि तुम्हाला त्याला एक वेगळा लूक द्यायचा असेल तर तुम्ही भरगोस कलाकुसर केलेल्या मोजडींचा उपयोग करू शकता.