नवी दिल्ली : ट्विटरवर ताबा मिळवल्यानंतर इलॉन मस्कनं अनेक टोकाचे निर्णय घेतले. माजी सीईओ पराग अग्रवालसह इतर बड्या पदाधिकाऱ्यांना त्यानं घरचा रस्ता दाखवला होता. मस्कच्या काळात ट्विटरच्या अनेक कर्मचाऱ्यांनी एकतर स्वतःहून राजीनामा दिला किंवा अनेकांना काढून टाकण्यात आलं.
दरम्यान, नोव्हेंबर २०२२ मध्ये मस्कनं प्रॉमिस केलं होतं की, “यापुढं ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना कमी केलं जाणार नाही. पण त्यानंतर दोनदा कर्चमारी कपात झाली. त्यानंतर आता पुन्हा एकदा कर्मचारी कपातीची घोषणा मस्कनं केली आहे.
‘दि व्हर्ज’च्या रिपोर्टनुसार, ट्विटरच्या सेल्स आणि इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमधील कर्मचाऱ्यांना गेल्या आठवड्यात काढून टाकण्यात आलं. या काढलेल्या कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी हे थेट मस्क यांनाच रिपोर्टिंग करत होते. हे कर्मचारी ट्विटरच्या अॅड. बिझनेससाठी काम करत होते. म्हणजेच कर्मचारी कपात करणार नाही, हे आपलं प्रॉमिस मस्कनं पाळलेलं नाही. कर्मचाऱ्यांना काढण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
काही दिवसांपूर्वी इलॉन मस्कनं युजर्सची जाहीर माफी मागितली होती, कारण त्यांना ट्विटरवर असंबंध आणि त्रासदायक जाहिराती दिसत होत्या. यावेळी त्यानं म्हटलं होतं की, किवर्ड्स प्रमाणं जाहिराती दिसतील आणि ट्विट्समध्ये टॉपिक दिसेल अशी पावलं उचलली जात आहेत. ज्याप्रमाणं गुगुल सर्च काम करतं त्याप्रमाणं हे काम चालेलं असंही मस्कनं म्हटलं होतं.