पुणे : देशाला प्रगतिपथावर नेताना धर्म आणि भावनात्मक गोष्टी टाळून सरकारला नवी कार्य दिशा ठरवावी लागणार आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, वीज, रस्ते आणि पाणी या गोष्टी प्रगत होणार नाहीत, तोपर्यंत हा देश पुढे जाऊ शकत नाही. ज्या देशात २३ टक्के लोकांजवळ घर नाही तेथे हर घर तिरंगा हा नाराच चुकीचा आहे, असे विचार राज्य सरकारच्या महात्मा फुले ग्रंथ प्रतिष्ठान समितीचे सदस्य सचिव व लेखक प्रा. हरी नरके यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी, पुणेतर्फे आयोजित सामाजिक नेतृत्व विकास कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड होते.
प्रा. नरके म्हणाले, ‘कोविडनंतर सरकारने आरोग्य क्षेत्रावर कोणताही खर्च केलेला नाही. देशाची लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी सरकारला कठोर पावले टाकावी लागतील. येणार्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे ६५ टक्के रोजगार कमी होणार आहे.आझादी का अमृत महोत्सव साजरा करताना प्रत्येक वर्गातील ६० टक्क्यांपेक्षा अधिक नागरिक हे द्रारिद्र्यरेषेखालील आहेत. शिक्षणासह सर्वच क्षेत्रांत आपण मागे असल्याची खंत आहे.