मार्गदर्शकांची दुकानदारी जोरात?
पुणे – MPSC aspirants situation : राज्य लोकसेवा आयोग अर्थात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या बोटावर मोजण्याइतपतच विद्यार्थ्यांना यश प्राप्त होते तर लाखो विद्यार्थी पुढील संधीची वाट पाहत असतात. परंतु त्यांच्या जीवावर अभ्यासिका, खानावळ, होस्टेल, पुस्तके, विविध मार्गदर्शक सिरीज चालविणारे मालामाल झाले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षार्थी उपाशी आणि बाकीचे तुपाशी असे चित्र गेल्या काही वर्षांमध्ये तयार झाले आहे.
ज्या परीक्षांची जाहिरात निघाली आहे त्याच्या परीक्षा २ ते ३ वर्षांनी न घेणे , निकाल वेळेत न लावणे, मागणीपत्र उशिरा पाठवणे या सर्व प्रक्रियेमुळे उमेदवार अडकून पडत आहेत. याकरिता लोकसेवा आयोगाची नोकर भरतीची प्रक्रिया गतिमान करणे गरजेचे आहे.
— महेश बडे, विद्यार्थी प्रतिनिधी, एमपीएससी स्टुडंट राइट्स
दरम्यान ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील आता स्पर्धा परीक्षांकडे मोठ्या प्रमाणात वळू लागले असून शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील स्पर्धा परीक्षांची ओढ लागल्याचे चित्र दिसून येते. शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षांची आता ओढ लागलेली दिसून येत आहे. तर स्पर्धा परीक्षांचे महत्त्वसुद्धा ग्रामीण युवक – युवतींना समजू लागले आहे. मात्र योग्य मार्गदर्शनाशिवाय यश मिळत नाही हे कुठेतरी या परीक्षार्थींच्या मनावर बिंबवलेले असते. त्यातूनच मग पहिल्यांदा क्लास चालकांचा शोध घेतला जातो. शहरी भागात नामांकित क्लासबरोबरच गल्लीबोळातही विविध मार्गदर्शक मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर असल्याचे दिसतात. या मार्गदर्शकांचे शुल्क ५० हजारांपासून ते लाखो रुपयांपर्यंत असल्याचे विद्यार्थ्यांच्या बोलण्यातून दिसून आले.
दरम्यान अनेक ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी तरुण-तरुणी पुण्यात येतात. त्यांना ठरावीक भागात खेळवून ठेवण्यासाठी क्लास चालक अभ्यासिका, खानावळ, होस्टेलच्या लोकांची साखळी काम करत असल्याचेही निदर्शनास आले आहे. एकूणच पायरेटेड पुस्तके, ऑनलाइन ऑफलाइन टेस्ट सिरीज चालविणारे आणि मार्गदर्शकांची दुकानदारीदेखील जोरात चालल्याचे वास्तववादी चित्र आहे. नोकर भरती बाबत शासनाची दिरंगाईची भूमिका उमेदवारांना स्पर्धा परीक्षा क्षेत्रात पाच ते सहा वर्षे अडकून ठेवण्यास जास्त कारणीभूत आहे.