मुंबई | एसटी महामंडळाच्या बससेवेची महाराष्ट्राच्या दळणवळणात महत्त्वाची भूमिका आहे. सर्वसामान्यांपासून सर्वचजण बसने प्रवास करत असतात. मात्र, अनेकदा लांबच्या प्रवासासाठी जागा मिळवणे हे आव्हान असतं. त्यामुळेच प्रवाशांना एसटी तिकिटांचे आरक्षण सहज करता यावे, यासाठी प्रवासी सुविधा अॅप तयार करण्यात येत असून, ऑगस्टपासून हे अॅप प्रवाशांना वापरता येणार आहे. याबाबत महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी एका कार्यक्रमात माहिती दिली.
सद्यस्थितीत एसटी महामंडळाच्या वेबसाईटवर तिकिट बुकिंग करताना अनेकदा प्रवासांच्या खात्यातून पैसे वजा होतात, मात्र, जागा आरक्षित होत नाही. यानंतर संबंधित प्रवाशांना ते पैसे मिळवण्यासाठी अनेकदा कष्ट घ्यावे लागतात. याशिवाय अनेकदा तिकिट आरक्षित करण्यासाठी आरक्षित जागा असलेल्या बसेस उपलब्ध हो नाहीत. तसेच तिकिट बुकिंगनंतर चुकीचे आसनक्रमांक आल्याचीही तक्रार प्रवाशांनी केली आहे. तिकिट बूक करताना महामंडळाची वेबसाईटच बंद झाल्याचेही प्रवाशांना अनुभव आले आहेत.
नव्या अॅप बुकिंगमध्ये काय उपाययोजना?
एसटी महामंडळाकडून लाँच करण्यात येणाऱ्या नव्या अॅपवर प्रवाशांना केवळ डेबिट-क्रेडिट कार्डवरूनच नाही, तर अगदी त्यांच्या मोबाईलमध्ये उपलब्ध असलेल्या गुगल पे, पेटीएम, अमेझॉन पे यांच्या माध्यमातूनही पेमेंट करता येणार आहे. या अॅपवर प्रवाशांना त्यांनी तिकिट आरक्षित केलेली बस नेमकी कुठं आहे हेही तपासता येणार आहे. त्यामुळे बसची वाट पाहत राहणं बंद होणार आहे. तसेच प्रवाशांना आपली कामं करून बसच्या वेळेत उपस्थित राहता येईल. या सुविधेसाठी राज्यातील ११ हजार बसमध्ये वाहन देखरेख प्रणालीचा वापर होणार आहे.