मुंबई: उद्योगविश्वातील मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही वर्षांत रिलायन्स जिओने टेलिकॉम क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. मात्र आता रिलायन्स जिओच्या संचालक पदाचा अब्जाधीश आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींनी राजीनामा दिला आहे. हा निर्णय 27 जूनपासून लागू झाला आहे.
रिलायन्स जिओ इन्फोकॉमने मुकेश अंबानींच्या राजीनाम्यासंदर्भातील माहिती आज (28 जून) दिली आहे. त्याचबरोबर आकाश अंबानी यांना कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडण्याची घोषणा करण्यात आली आहे. इतर नियुक्त्यांमध्ये, पंकज मोहन पवार 27 जूनपासून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारतील.
तसंच रामिंदर सिंग गुजराल आणि के व्ही चौधरी यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर 2021 मध्ये अंबानी यांनी कंपन्यांची जबाबदारी नवीन पिढीकडे सोपविली जाणार असल्याची घोषणा केली होती.