मनमाड (जि. नाशिक) | Mukund Aher Wins Gold At Khelo India – हरियाणा येथे सुरू असलेल्या चौथ्या राष्ट्रीय ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत महाराष्ट्राच्या २० वर्षीय आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद आहेरने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. मुकुंद आहेरने वेटलिफ्टिंग प्रकारात ५५ किलो वजनी वजनी गटात सुवर्णपदक पटकावून राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे. ‘खेलो इंडीया’ स्पर्धेतील मुकुंदचे हे सलग तीसरे सुवर्णपदक आहे.
गेल्या दोन वर्षांपूर्वी २०२० च्या जानेवारी महिन्यात आसामच्या गौहाटी येथे पार पडलेल्या खेलो इंडीया राष्ट्रीय स्पर्धेमध्ये मनमाडच्या मुकुंद आहेरने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावत महाराष्ट्राच्या लौकिकात भर घातली होती. तसंच मुंकुंदची या वर्षी देखील वेटलिफ्टिंग खेळातील तयारी सुरू होती. वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाडच्या जय भवानी अद्यावत व्यायामशाळेत त्याने प्रशिक्षण घेतलं. त्याचबरोबर हरियाणा राज्यातील पंचकुला येथे सुरू असलेल्या चौथ्या राष्ट्रीय ‘खेलो इंडिया २०२२’ स्पर्धेत महाराष्ट्राच्या २० वर्षीय आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद आहेर याने स्नॅच मध्ये ९९ किलो व क्लिन जर्क मध्ये १२१ किलो असे एकूण २२० किलो वजन उचलून टॉपचे स्थान पटकावत सुवर्णपदकावर आपले नाव कोरलं आहे. मुकुंद या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा देशातील चमकदार खेळाडू ठरला आहे.
दरम्यान, वयाच्या ५ व्या वर्षापासून वेटलिफ्टिंगचा सराव करणारा मुकुंद अगदी थोड्या कालावधीत आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून उदयास आला आहे. २०१८ मध्ये त्याला आसामच्या गौहाटी येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक मिळाले. तसंच २०१९ मध्ये बोधगया येथे झालेल्या राष्ट्रीय युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक तर २०२० च्या जानेवारी महिन्यात आसामच्या गौहाटी येथे झालेल्या तिसऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवीत राज्याचा नावलौकिक केला आहे.