बहुरंगी, सालस प्रदीप..

विश्वास मेहेंदळे, ज्येष्ठ पत्रकार

तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचं अपघाती निधन झालं आणि ती बातमी देण्याची वेळ प्रदीपवर आली. त्यावेळी त्यानं दाखवलेलं संयत स्वरूपाचं व्यक्तिमत्त्व त्याच्या एकंदर स्वभावाला साजेसं होतं. शेवटी प्रदीप भिडे हा प्रदीप भिडे होता. त्याची कामावर विलक्षण निष्ठा होती. असा प्रदीप माझ्या उर्वरित आयुष्यात होईल की नाही हे माहीत नाही. माझ्यापेक्षा तरुण असणार्‍या प्रदीपला भावपूर्ण श्रद्धांजली…

काय दुर्दैव आहे पाहा, ज्यांनी आम्हाला श्रद्धांजली वाहायची त्यांच्यापैकी प्रदीप भिडे या सहकार्‍याला श्रद्धांजली वाहण्याचा दुर्दैवी योग आमच्यावर आला आहे, यासारखं दुसरं दुर्भाग्य नाही. प्रदीप गेल्याचं अतीव दु:ख वाटतं. एक सज्जन, मनमिळावू माणूस, वृत्तनिवेदक म्हणून असणारी हुकुमत, सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची क्षमता, परमेश्वराने वरूनच रंगरंगोटी करून, तयार करून एक वृत्तनिवेदक सादर करावा असं वाटणारी एकूण बैठक. सदासर्वकाळ हसतमुख आणि कधीही न दुर्मुखलेला असा हा सवंगडी गेल्याचं दु:ख हे आपणा सर्वांनाच आहे, यात शंका नाही. तो काही काळ पुण्याजवळच्या हडपसर भागामध्ये राहिला. काही काळ पुण्यात राहिला आणि बरीच वर्षं मुंबईत राहिला. सुरेश भटांच्या कवितेप्रमाणे ‘रंगूनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा, गुंतूनी गुंत्यात सार्‍या पाय माझा मोकळा…’ अशा प्रवृत्तीनं वावरणारा आमचा हा सहकारी गेली काही वर्षं कर्करोगासारख्या दुर्धर दुखण्यानं आजारी होता. प्रदीपसारखा हरहुन्नरी मित्र आणखी दहा-पंधरा वर्षं सहज जगू शकला असता आणि असंख्य चाहते निर्माण केले असते. पण म्हणतात ना, ईश्वराच्या इच्छेपुढे कोणाचंच काही चालत नाही.

‘मॅन प्रपोझेस, गॉड डिस्पोझेस…’ दूरदर्शनच्या वृत्तविभागाला कोणाची तरी दृष्ट लागली की काय कोणास ठाऊक? काही वर्षांपूर्वी अभिनेत्री म्हणून नाव कमावणारी स्मिता पाटील अचानक आपल्यातून निघून गेली. स्मिता गेली, खूप मोठी अभिनेत्री होऊन गेली. दूरदर्शनच्या वृत्तविभागावर कोसळलेलं ते पहिलं संकट होतं. आणखी काही वर्षं गेली आणि भक्ती बर्वे, चारुशिला पटवर्धन, स्मिता तळवलकर नावाच्या तितक्याच देखण्या, उत्तम शब्दोच्चार असणार्‍या निवेदिका अचानक पडद्याआड गेल्या.

या सहकार्‍यांबद्दल दु:ख वाटतं, याचं प्रमुख कारण म्हणजे या सगळ्या वृत्तनिवेदिका आणि प्रदीप भिडेसारखा वृत्तनिवेदक वृत्तविभागाची शान होती. इतकं चांगलं वाचन, वाणीवरचा इतका चांगला संस्कार, वाक्याची समज आणि मुख्य म्हणजे आपण वाचत असलेल्या बातम्या हजारो लोक ऐकणार आहेत, तेव्हा त्या कशातरी वाचून न टाकता वाचनाची आवश्यक ती गती पकडून, तसंच त्यातला भावार्थ लक्षात घेऊन बातम्या वाचण्यात ही सगळीच मंडळी निष्णात होती. या निमित्ताने एक गोष्ट सांगावीशी वाटते की, गेलेल्या या पाचही वृत्तनिवेदकांचा त्यांच्या कामावर असणारा विश्वास आणि बांधीलकी आजच्या वृत्तनिवेदकांमध्ये आहे असं म्हणणं धाडसाचं ठरेल.

प्रदीप भिडे हा या पाचही जणांपैकी एक उत्तम निवेदक होता. तो सूत्रसंचालकही होता. तो देखणा तर होताच होता. भरपूर उंची, नाकीडोळी निटस, उच्चारणात एखाद्या दशग्रंथी ब्राह्मणाची पद्धती आणि स्पष्ट शब्दोच्चार यामुळे या चारही जणींबरोबर प्रदीप भिडेही कायम स्मरणात राहील. ही पाचही माणसं सुरेख होती, असं मी म्हणतो, कारण त्यांच्यावरील संस्कार चेहर्‍यावर आणि त्यांच्या पडद्यावरील उपस्थितीवर ठळकपणे दिसत असे.

या ठिकाणी आणखी एक बाब नमूद करावीशी वाटते ती अशी की, विख्यात नाटककार श्री. ना. पेंडसे यांनी मुंबईतल्या साहित्य संघासाठी लिहिलेल्या ‘पंडित! आता तरी शहाणं व्हा!’ या विहंग नायक या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेल्या नाटकात प्रदीप नायकाचं काम करायचा. प्रदीपला नाटकात त्या मानाने काम कमीच होतं, पण त्या छोट्या भूमिकेतही तो आपली छाप पाडून जायचा. प्रदीप पत्रकार होता, निवेदक होता, सूत्रसंचालक होता. मुंबईत स्वत:चा ऑडिओ स्टुडिओ चालवून रेकॉर्डिंग करणारा होता. प्रदीप खरोखरीच जनसंपर्कातला बादशहा होता. याचं कारण आमच्या तीस-पस्तीस वर्षांच्या सहवासात त्याने कधीच कोणाशी आवाज चढवून बोलल्याचं मी बघितलेलं नाही. त्याच्यावर रयत शिक्षण संस्थेत काम करणार्‍या आई-वडिलांच्या शिक्षकी पेशाचा फार मोठा प्रभाव होता. तो विलक्षण नम्र होता. मानापमानाच्या त्याच्या कल्पना इतर जनसामान्यांप्रमाणे टोकदार नव्हत्या. ऐन उमेदीत, तरुण वयात मुंबई दूरदर्शन केंद्रात वावरणारा हा निवेदक महिलावर्गाच्या कोंडाळ्यात असायचा; परंतु त्याच्याविषयी कधीच वाईटसाईट कानावर आलं नाही. त्याच काळात पुढे ‘कृष्ण’ या भूमिकेमुळे नावारूपाला आलेला नितीश भारद्वाज हादेखील बातम्या वाचायचा. एकूणात काय तर प्रदीपचं स्मरण करताना तो सगळा काळ आठवतो आणि ही सगळी सुसंस्कृत मंडळी वृत्तविभागात होती याचा आजही आनंद आणि अभिमान वाटतो.

प्रदीपचे आई-वडील दोन-चार वेळा दूरदर्शन केंद्रात आले होते. मुळात रयत शिक्षण संस्थेच्या संस्कारात वाढलेलं हे दाम्पत्य अत्यंत साध्या राहणीचं होतं. प्रदीपची राहणीही तशीच साधी होती. त्याची पत्नी आणि तो असे दोघे मिळून मुंबईत साऊंड स्टुडिओ चालवायचे. प्रदीप वडिलांना एकटा नव्हता, त्याला एक भाऊ आहे. प्रदीपचे सासरे लग्नापूर्वीपासूनच त्याच्यावर नितांत प्रेम करीत. एकुलत्या एक कन्येबरोबर प्रदीपचा विवाह झाला त्यावेळी काय किंवा प्रदीपच्या मुलाचं लग्न झालं तेव्हा काय… आम्ही दूरदर्शनमधले काही लोक सोहळ्याला हजर होतो. प्रदीपचं नाव मोठं होतं. तो सेलिब्रिटी होता, तरीही त्या लग्नकार्यांमध्ये डामडौल, पैशाची उधळपट्टी दिसली नाही. याचं कारण त्या सार्‍या कुटुंबावर प्रगल्भ विचार आणि मूल्यांचा पगडा होता. मुंबईत वावरतानाही एखाद्या टपरीवर चहा पिण्याची प्रदीपची नेहमीच तयारी असे. त्याला कुठलीही घमेंड नव्हती. एक प्रसंग आवर्जून आठवतो. तो म्हणजे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचं अपघाती निधन झालं आणि ती बातमी देण्याची वेळ प्रदीपवर आली. ती जबाबदारी त्याने संयतपणे पार पाडली.

Sumitra nalawade: