मुंबई पलिकेत चिंधी चोरांचा सुळसुळाट! ग्लास, चमच्यासह जेवणाची ताटंही गायब

मुंबई : (Mumbai Corporation) मुंबईचा डोलारा सांभाळणाऱ्या मुंबई महापालिका मुख्यालयाच्या (BMC) उपहारगृहातून (canteen) गेल्या वर्षभरात जेवणाची ताटे, चमचे, ग्लास अशी हजारो भांडी गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आशिया खंडातल्या सर्वात श्रीमंत महापालिकेत असा प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पालिकेतील कर्मचारी, अधिकारी जेवण, नाश्ता आपल्या कार्यालयात मागावतात पण खावून झाल्यानंतर ही भांडी उपहारगृहाला परतच करत नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे ही भांडी मागितल्यास त्यांच्याकडून मात्र आपण घरातूनच ती आणल्याचे सांगितलं जात आहे. या बनवाबनवीमुळे उपहारगृह चालक मेटाकुटीला आले असून भांडी परत करण्याचे आवाहन कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना केले आहे.

दरम्यान, हा सर्व प्रकार थांबवण्यासाठी मुंबईच्या महापालिकेच्या कॅन्टीनबाहेर सूचना फलक लावण्यात आला आहे. उपहारगृहातून भांडी बाहेर घेऊन जाऊ नका! अशी सूचना या फलकावर लिहिण्यात आली आहे. मागील वर्षभरात कॅन्टीनमधून हजारो भांडी गायब झाली असून 40 ते 50 हजारांचे नुकसान झाल्याची माहिती कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

एवढी भांडी झाली गायब

चमचे – 6 ते 7 हजार
लंच प्लेट – 150 ते 200
नाश्ता प्लेट – 300 ते 400
ग्लास – 100 ते 150

दरम्यान, भांडी चोरु नका आणि चोरलेली परत करा असे आवाहन करणारा फलक देखील महापालिकेच्या कॅन्टीनमध्ये लावण्यात आला आहे. यामुळे आता तरी काही फरक पडतो का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणा आहे.

Prakash Harale: