मुंबई : (Mumbai Former Police Commissioner Sanjay Pandey arrested by ED) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना सक्तवसुली संचलनालयानं (ED) मंगळवार दि. 19 रोजी उशिरा दिल्लीत अटक केली. ईडीने नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) गैरव्यवहार व दूरध्वनी अभिवेक्षण प्रकरणात पांडे यांची अनेकवेळा चौकशी केली आहे. त्यांच्या कुटुंबियांशी संबंधीत १८ कोटी रुपयांच्या संशयीत व्यवहारांबाबत ईडीकडून तपास सुरू होता. पांडे यांच्या अटकेच्या वृत्ताला वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला.
संजय पांडे यांचे कुटुंबीय संचालक असलेल्या कंपनीशी संबंधित १८ कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराबाबत ईडीकडून तपास सुरू होता. त्यांनी आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनी सुरू केली होती. या वेळी त्यांनी २००६ मध्ये कंपनीत आपल्या आईला आणि मुलाला संचालक केले. २०१० ते २०१५ या कालावधीत या कंपनीला एनएसई सव्र्हर आणि संगणकीय यंत्रणा, माहिती तंत्रज्ञान लेखापरीक्षण करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. पण त्या काळात एनएनईमध्ये को-लोकेशन गैरव्यवहार झाला होता.
याबाबत २०१८ मध्ये सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. त्या आधारावर ईडी या प्रकरणी तपास करत होती. गैरव्यवहाराबाबतची माहिती आयसेक सव्र्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या लेखापरिक्षणात कशी उघड झाली नाही, याबाबत सीबीआय तपास सुरू होता. याशिवाय आरोपींनी २००९ ते २०१७ या काळात भारतीय टेलिग्राफ कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करून एनएसई कर्मचाऱ्यांचे दूरध्वनी अभिवेक्षण करण्यात आल्याचा आरोप होता. १९८६ च्या तुकडीचे पोलीस अधिकारी असलेले पांडे हे ३० जून रोजी मुंबई पोलीस आयुक्त म्हणून सेवेतून निवृत्त झाले.