मुंबई : महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या पहिल्याच दिवशी पर्यावरण र्हासाच्या कारणाने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मधून जाणारा मेट्रो कारशेड प्रकल्प स्थगित केला होता. तसंच, हा कारशेड प्रकल्प कांजूरमार्गाला हलवण्याची प्रक्रिया देखील सुरू केली होती. त्यामुळे मागील अडीच वर्षांपासून या प्रकल्पाचे काम रखडलेले होते. मात्र, नवीन सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने ठाकरे सरकारच्या निर्णयाला मोठा धक्का दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारशेड प्रकल्पावरील स्थगिती हटवली आहे. त्यामुळे हा प्रकल्प आता आरे मध्येच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
२०१४ नंतर भाजप – शिवसेना सरकार अस्तित्वात आल्यानंतर कारशेड प्रकल्प आरेमध्ये होईल असा निर्णय घेण्यात आला होता. प्रकल्पाचे कामही जवळपास २५ टक्के झाले होते. मात्र, २०१९ मध्ये महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर ठाकरे सरकारने कारशेडमूळे पर्यावरण ऱ्हास होत असल्याचं कारण देत या प्रकल्पावर स्थगिती आणली होती. त्यानंतर कारशेड कांजूरमार्ग येथे हलवण्याचा ठाकरे सरकारने निर्णय घेतला होता.
कांजूरमार्ग येथे जागेच्या मालकीवरून वाद निर्माण झाला होता. नंतर तो वाद उच्च न्यायालयात गेला आहे. दरम्यान, ठाकरे सरकारच्या निर्णयानंतर अडीच वर्षांनी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत कारशेड आरेमध्येच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. त्यानुसार न्यायालयातील पुढील सुनावणीच्या वेळी राज्यशासनाची भूमिका मांडण्याची सूचना महाधिवक्त्यांना देण्यात आली आहे.