सलमान खानच्या जीवाला धोका, मुंबई पोलिसांकडून ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा प्रदान

मुंबई | Salman Khan – बाॅलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) जीवाला धोका असल्यानं त्याच्या सुरक्षेमध्ये आणखी वाढ करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सलमान खानला बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच यापुढे सलमानला मुंबई पोलिसांकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा (Y+security) प्रदान केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

एएनआयनं केलेल्या ट्विटमध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. सलमान खानला यापुढे वाय प्लस सुरक्षा देणार असल्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. सिद्धू मुसेवाला प्रकरणातील आरोपी बिष्णोई गँगकडून सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी एक निनावी पत्र सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्या नावानं आलं होतं. यानंतर सलमाननं त्याविषयी मुंबई पोलिसांना माहिती दिली होती.

दरम्यान, लाॅरेन्स बिष्णोईकडून आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीमुळे मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच काही दिवसांपासून मुंबई पोलिसांचा सलमानच्या घरी पहारा सुरू आहे.

Sumitra nalawade: