महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर १०६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. एआयद्वारे तयार करण्यात आलेल्या आयटीएमएस प्रणालीअंतर्गत हे कॅमेरे बसवण्यात आले असून यामुळे वाहतूक पोलिसांना बेजबाबदार चालकांवर कारवाई करणे सोपे होईल.
आयटीएमएस प्रणालीअंतर्गत पहिल्या टप्प्यात २०० सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. त्यापैकी १०६ कॅमेऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे. ९४ किमीचा हा मार्ग असून त्याच्या दुतर्फा कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या सहाय्याने १७ प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद ठेवली जाऊ शकते. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि राज्य परिवहन विभाग यांनी संयुक्तरित्या आयटीएमएस प्रणाली तयार केली आहे. याअंतर्गत एकूण ४३० कॅमेरे मार्गाच्या दुतर्फा लावले जाणार आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करून प्रवास सुरक्षित करणे हे आयटीएमएस प्रणालीचे उद्दिष्ट आहे. यापूर्वी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अनेकदा मोठे अपघात घडले आहेत. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर काही जण जखमीही झाले आहेत. त्यामुळे हा मार्ग अधिक सुरक्षित करण्यावर भर दिला जात आहे. प्रत्येक वाहनाच्या नंबरप्लेटची नोंद घेतली जाईल अशी व्यवस्था सर्व टोलनाके आणि कॅमेऱ्यांमध्ये करण्यात आली आहे. यामुळे वाहतूक पोलिसांना संबंधित वाहनचालकांना ई-चलान पाठवता येईल. ई-चलानद्वारे ५०० ते २ हजार रुपये दंड ठोठावला जातो.
द्रुतगती मार्गाच्या सर्व प्रवेशद्वारांवर वाहनांचे वजन तपासणारी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. तसेच वातावरणाचा अंदाज व नोंद घेणारी यंत्रणा ११ ठिकाणी बसवण्यात आली आहे. वातावरण, बंद रस्ता, वाहतुकीची स्थिती यांबाबत वाहनचालकांना योग्य त्या सूचना देण्यासाठी २३ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. टो व्हॅन, क्रेन, रुग्णवाहिका अशी ३६ आपत्कालीन वाहने तयार ठेवण्यात आली आहेत.