मुंबई : (Mumbai Rain News) मुंबई शहर व उपनगरात पहाटेपासून मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या त्यामुळे सकल भागात काही वेळासाठी पाणी साचले होते. मात्र याचा शहरातील वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. मध्य व पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवाही वेळापत्रकानुसार सुरू होती.
मुंबई व उपनगरात आज सकाळी पडलेल्या पावसामुळे मान्सून दाखल झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र मान्सून येत्या दोन ते तीन दिवसात दाखल होईल, असे वेधशाळेकडून सांगण्यात येत आहे. मुंबई शहर व उपनगरात पडलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे दादर, सायन, अंधेरी, सांताक्रुझ, बोरीवली, गोरेगाव, कुर्ला आदी ठिकाणी सकल भागात पाणी साचले होते. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांची चांगलीच धावपळ उडाली.
सीएसएमटीसह दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला, बांद्रा टर्मिनस आदी ठिकाणी बाहेरगावावरून आलेल्या प्रवाशांना भिजतच आपले घर गाठावे लागले, मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीत गाड्या वेळापत्रकानुसार सुरु होत्या. पश्चिम द्रुतगती महामार्गासह पश्चिम उपनगरातील एस. व्हि. रोड सकाळी काही प्रमाणात वाहतूक कोंडी होती. मात्र अन्य ठिकाणी वाहतूक सुरळीत सुरू होती.