मुंबई | Rain Updates – सध्या राज्यात पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांना हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसंच मुंबई (Mumbai) शहर आणि उपनगरांत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे हवामान विभागानं मुंबईला अतिवृष्टीचा इशारा दिला होता. तर आता पावसाचा जोर लक्षात घेता हवामान विभागानं उद्या (28 जुलै) सकाळी 8.30 पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
मुंबईमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे सखलभागांत पाणी साचले असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. त्याचबरोबर लोकल सेवाही धिम्या गतीनं सुरू आहे. पावसाचा जोर कायम असल्यामुळे हवामान विभागानं नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. मुंबईतील शाळांना देखील आज सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. तसंच गरज असेल तरच बाहेर पडण्याचे आदेशही नागरिकांना देण्यात आले आहेत.