पैसे भरण्यासाठी हप्ते सुविधा द्या
महापालिकेची कारवाई सुरू असताना एकाचवेळी एक ते दोन लाखांची रक्कम भरणे शक्य नसल्याचे अनेक व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून व्यवसाय बंद असल्याने पैसे भरण्यास हप्ते सुविधा देण्याची विनंतीही व्यावसायिकांनी केली. मात्र, शहरातील इतर व्यावसायिक वाढलेले शुल्क, तसेच कोरोना काळातील शुल्क भरत असताना तुम्हीच का भरत नाही, असा सवाल पालिकेने केला.
पुणे : तुळशीबागेतील व्यावसायिकांनी गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेचे शुल्क न भरल्याने याविरोधात गुरुवारी अतिक्रमण विभागाने कारवाई केली. सारसबागेनंतर महापालिकेने पथारी परवाना शुल्काचे तब्बल ३ कोटी रुपयांच्या थकबाकीप्रकरणी महापालिकेकडून तुळशीबागेतील व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली.
यावेळी सुमारे २२१ व्यावसायिकांची दुकाने महापालिकेने बंद केली होती. त्यानंतर सुमारे ९० व्यावसायिकांनी थकबाकी भरली असून, त्यांना व्यवसाय करण्यास दुपारनंतर मुभा देण्यात आली आहे. मात्र, महापालिकेने अचानक केलेल्या कारवाईमुळे या भागात मोठा गोंधळ उडाला. तुळशीबागेत २२१ स्टॉलधारक आहेत. गेल्या चार वर्षांपासून त्यांनी महापालिकेचे शुल्क भरले नसल्याने ही थकबाकी चार कोटीच्या जवळपास गेली होती.
कोरोनाच्या काळातील २२० दिवसांचे शुल्क माफ केल्याने प्रत्येकाला १ लाख ३७ हजार रुपये शुल्क भरणे आवश्यक होते. वारंवार पाठपुरावा करूनदेखील हे व्यावसायिक शुल्क भरण्यास टाळाटाळ करीत असल्याने ही थकबाकीची रक्कम ३ कोटीपेक्षा जास्त झाली आहे. महापालिकेने परवाना शुल्काचे सुधारित दर लागू केल्यानंतर व्यावसायिकांनी दराला आक्षेप घेतला होता. तसेच राजकीय मध्यस्थी करीत हे शुल्क कमी होईल या भरवशावर हे शुल्क भरले नव्हते.