आदित्य ठाकरे यांचे स्पष्टीकरण
अयोध्या : शिवसेनानेते आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे लखनऊ विमानतळावर जंगी स्वागत झाले. यावेळी त्यांचे ढोलताशांच्या गजरात फुलांच्या पायघड्यांनी स्वागत करण्यात आले. विमानतळाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना हा दौरा राजकीय नाही. हा श्रद्धेचा विषय असून, मी दर्शन घेण्यासाठी आलो आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य म्हणाले की, देवळात गेल्यावर मागणे मागण्यापेक्षा मी आशीर्वाद घेत असतो. जे काही दिले आहे, सेवा करण्याची संधी दिली आहे, त्यासाठी धन्यवाद बोलत असतो. ही रामराज्याची भूमी राजकारणाची नाही. ही भूमी भारताच्या आस्थेची आहे. आमचे राजकारण समाजकार्यासाठी असते. हातून चांगले कार्य व्हावे, अशी प्रार्थना करीत असतो.
आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून अयोध्येत येत आहोत. आतादेखील मी फक्त श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला आलो आहे. प्रभू श्रीरामाच्या भूमीत मी कोणतेही राजकीय आरोप-प्रत्यारोप करणार नाही. आमच्या हातातून चांगले कार्य घडू दे, एवढीच प्रार्थना मी श्रीरामाच्या चरणी करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यानंतर आदित्य ठाकरे ‘जय सियाराम’चा नारा देत अयोध्येच्या दिशेने मार्गस्थ झाले.
आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसैनिकदेखील मोठ्या संख्येने अयोध्येत दाखल झाले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊतही आदित्य यांच्या दौर्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरेंचा अयोध्येमध्ये दिवसभराचा कार्यक्रम आहे. लखनऊ विमानतळाकडून ते अयोध्येसाठी रवाना झाले. दुपारी आदित्य ठाकरे इस्कॉन मंदिराला भेट देणार आहेत. यानंतर ते पत्रकार परिषद घेतील. यानंतर ते संध्याकाळी लक्ष्मण किलाला भेट देणार असून, शरयू नदीच्या किनार्यावर आरती करणार आहेत. यानंतर त्यांचा परतीचा प्रवास सुरू होईल.
महाराष्ट्रातील अनेक नेते सातत्याने अयोध्यामध्ये येत आहेत. त्यामध्ये संजय राऊत यांच्यासह रोहित पवारही येथे येऊन गेले. मनसेप्रमुख राज ठाकरेही अयोध्येला भेट देणार आहेत.