Tabu Love story : अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी छाप उमटवणारी अभिनेत्री म्हणून तब्बूची खास ओळख सांगितली जाते. तब्बूचे अनेक चित्रपट आजही हिट आहेत. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसबरोबर चाहत्यांच्या मनावर एक वेगळीच जादू निर्माण केली आहे. आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या तब्बूचे खासगी आयुष्य कायमच चर्चेचा विषय ठरले आहे. तिने अद्याप लग्न केलेले नाही. मात्र एकेकाळी तब्बूच्या अफेरच्या चर्चा रंगल्या होत्या. दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांच्याबरोबर तिचे नाव जोडण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, नागार्जुन अक्किनेनी आणि तब्बू याचं तब्बल 10 वर्षांनंतर ब्रेकअप झालं. 10 वर्षांनंतर दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या. पण आजही अक्किनेनी नागार्जुन आणि तब्बू चांगले मित्र आहेत. खुद्द तब्बूने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये नागार्जुन अक्किनेनी याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मौन सोडलं.
तब्बू पुढे म्हणाली, ‘नागार्जुन अक्किनेनी माझ्या आयुष्यातील खास व्यक्तींपैकी एक आहे. तो कायम माझ्या मनात राहिल. या जगात कोणतंच नातं आम्हाला वेगळं करु शकत नाही. अक्किनेनी नागार्जुन याच्यासोबत असलेल्या नात्याला लावयला माझ्याकडे कोणतंही लेबल नाही. आमच्यातील मैत्री कोणतंही दुसरं नातं तोडू शकत नाही…’ असं देखील ती म्हणाली.
तब्बू आणि नागार्जुनच्या नात्याची चर्चा रंगत असताना एकदा एका मुलाखतीत त्याने स्वत: याबद्दल जाहीरपणे वक्तव्य केले होते. नागार्जुन अक्किनेनी आणि तब्बू यांची ओळख अभिनेत्री 16 आणि अभिनेता 22 वर्षांचा असताना झाली होती. आज नागार्जुन अक्किनेनी त्याच्या आयुष्यात फार पुढे गेला आहे. तब्बू मात्र आजही एकटं आयुष्य जगते. आज तब्बू आणि अक्किनेनी नागार्जुन यांच्या नात्याला अनेक वर्ष झाली पण त्यांच्या नात्याची चर्चा कायम रंगलेली असते.