मुंबई- Maharashtra Politics | आज दिवसभरात राजकीय वातावरणात मोठा भूकंप आल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे काही आमदार घेऊन राज्याचे नगरविकास मंत्री सुरतेत रवाना झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान शिवसेनाच नाही तर राज्यातील सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु आहेत. पक्षांतील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकार यंत्रणांचा गैरवापर करून राज्यातील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका केली आहे.
एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांना घेऊन रवाना झाले असताना भाजप राज्यातील सरकार पडण्यासाठी गेम करत असल्याची टीका महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केली जात आहे. शिवसेनेच्या नेत्यांवर दबाव टाकला जात असल्याचंही त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. नाना पटोले यांनीही भाजपवर टीकास्त्र झोडले आहे.
राज्यातील सत्ता काबीज करण्यासठी भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. मात्र त्यांची खेळी त्यांच्यावरच पालटणार आहे. राजकारणासाठी आणि पैसा कमवण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर करणे हे भारतीय लोकशाहीसाठी घटक आहे. भाजपला हे महागात पडणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.